
कलिगडांनी रानमाळ बहरणार
तळा, ता. २ (बातमीदार) ः तालुक्यातील बोरघरहवेलीचा रानमाळावर यंदा कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हा ओसाड रानमाळ बहरणार आहे.
वावेहवेली लघुपाटबंधाऱ्याच्या पूर्वेला असणारा माळरान अनेक वर्षांपासून ओसाड होता. या मात्र येथील तांबडी माती पिकासाठी सुपीक असल्याचे लक्षात आल्यावर एका तरुण शेतकऱ्याने धरणाच्या पाण्यावर माळरानात कलिंगडाची लागवड केली आहे. आता कलिंगडाची रोपे जोमाने वाढू लागली आहेत, त्यामुळे लवकरच रसरशीत कलिंगड भाव देऊन जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शेती विषयक उच्च शिक्षण घेतले असून वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड आहे. माळरानात कलिंगडाची लागवड केली असून त्यासाठी कोल्हापुरातून रोपे आणली आहेत. लागवड तंत्रशुद्ध पद्धतीने केल्याने दोन महिन्यात फळे तयार होतील. सध्याचे हवामान अनुकूल असून त्यामुळे कलिंगडाचे पीक वेळेवर येईल, असा विश्वास आहे.
- स्वानंद महाडीक, तरुण शेतकरी