वज्रेश्वरी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वज्रेश्वरी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
वज्रेश्वरी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

वज्रेश्वरी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २ (बातमीदार) : नववर्षाच्या पहिल्या दिवशी रविवारी (ता. १) तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी, गणेशपुरी, अकलेली कुंड येथे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लावल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे येथील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत होता. कोरोनामुळे मागील दोन वर्षे मंदी होती; मात्र आता गर्दी होत असल्याने व्यावसायिक सुखावले आहेत. नववर्षात वज्रेश्वरीत हजारोच्या संख्येत भाविक व त्यांची वाहने दाखल होत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
भाविकांची गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यावसायिक यांचा व्यवसायदेखील तेजीत होता. परिसरातील दुकाने, हॉटेल व लॉज ग्राहकांनी गजबजले आहेत. येथील हॉटेल, खेळण्याची व शोभिवंत वस्तूंची दुकाने, नारळ, हार, फुले विक्रेते, प्रसाद व पेढेवाले जय्यत तयारीत होते. मंदिर परिसरात मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. वज्रेश्वरी मंदिर परिसरात अनेक महिलांकडून फळे, कंदमुळे विक्री केली जात आहेत.

------------------
मंदिर परिसरात कोंडी
वज्रेश्वरीमध्ये खासगी वाहने, डंपर, अवजड व लक्झरी वाहनांची ये-जा, नियमांचे उल्लंघन करणारे चालक, अरुंद रस्ते व रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने व बांधकामे यामुळे सतत वाहतूक कोंडी असते. सुट्ट्यांच्या काळात तर मोठ्या प्रमाणात पर्यटक व भाविक दाखल झाले होते. या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येऊन वारंवार अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

-------------------
ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मेटल डिटेक्टर लावले आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग करण्यात आले होते. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची पार्किंगदेखील आहे. सुसज्ज स्वच्छतागृहदेखील उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत नाही.
- राजू पाटील, अध्यक्ष, वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थान

--------------------------
नाताळच्या सुट्ट्या व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आता मोठ्या प्रमाणात भाविक वज्रेश्वरी दर्शनासाठी येत आहेत. भाविकांची गर्दी असल्याने व्यवसायदेखील चांगला होत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे ठप्प झालेल्या व्यावसायाला आता गती मिळत आहे.
- सूरज कोंडलेकर, व्यावसायिक