
थकबाकीदारांची नावे झळकणार फलकांवर
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : मालमत्ता कराच्या उत्पन्नात पंचवीस ते तीस टक्के वाढ करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून जारी केल्यानंतर करवसुली अधिक तीव्र करण्याचा निर्णय मिरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांनी घेतला आहे. एरवी मार्च महिन्यात सुरू होणारी करवसुली मोहीम या वेळी जानेवारी महिन्यातच सुरू करण्यात येणार आहे. यासाठी करवसुलीसाठी थकबाकीदारांची नावे फलकांवर जाहीर करणे, त्यांच्या मालमत्ता जप्त करणे किंवा सील करणे आदी धडक कारवाई महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे.
मालमत्ता कराचे उत्पन्न आधीच्या वर्षीपेक्षा पंचवीस ते तीस टक्के वाढले नाही तर पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाला अपात्र ठराल, असा इशारा नुकताच राज्य सरकारकडून महापालिकांना देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त दिलीप ढोले यांनी कर विभागाची नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त संजय शिंदे, सहायक आयुक्त चंद्रकांत बोरसे, सिस्टम मॅनेजर राजकुमार घरत, कर निरीक्षक, कर वसुली लिपिक उपस्थित होते. या वेळी मोठ्या थकबाकीदारांकडून करवसुली लवकरात लवकर कशी होईल व महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या, या अनुषंगाने ही आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी नागरिकांनी कराचा भरणा तातडीने करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
....
आयुक्तांचे आदेश
आगामी तीन महिन्यांत प्रशासनाला मालमत्ता कराची प्रभावी वसुली करायची आहे. मिरा-भाईंदर शहरामधील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असून मालमत्ता कर वसुलीवर याचा नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे ज्या रहिवासी सोसायटींमधील नागरिकांनी कराचा भरणा केलेला नाही, त्या सोसायटीमध्ये किंवा सोसायटी परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या नजरेत येईल अशा ठिकाणी त्यांच्या नावाचे, मालमत्ता क्रमांकाचे फलक लावून कर भरणा न करणाऱ्या नागरिकांची प्रसिद्धी करण्याचे त्याचबरोबर शहरातील मोठे थकबाकीदार, शॉपिंग मॉल, मोबाईल टॉवर, हॉटेल्स व स्टुडिओ या मोठ्या मालमत्ता धारकांना नोटीस बजावून व त्यांच्या मालमत्ता सील करून करवसुली करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व कर निरीक्षकांना दिले.