कांद्याला वाढती थंडी पोषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याला वाढती थंडी पोषक
कांद्याला वाढती थंडी पोषक

कांद्याला वाढती थंडी पोषक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २ : लांबलेल्या पावसामुळे जमिनीमध्ये बऱ्यापैकी ओलावा शिल्लक आहे. त्याचबरोबर थंडीमुळे दव पडण्याचे प्रमाण जास्त असल्याने पांढऱ्या कांद्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यात पांढऱ्या कांद्याची वाढ समाधानकारक होत असल्याने अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक स्थिती सुधारण्याची आशा निर्माण झाली आहे.
मागील वर्षी जीआय मानांकन मिळाल्यानंतर पहिल्या हंगामातील पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी अलिबाग तालुक्यातील शेतकरी सरसावले आहेत. या पिकाखाली असलेले मर्यादित लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने आत्मा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी १० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भातपिकाची कापणी झाल्यानंतर लगेचच पांढऱ्या कांद्याची लागवड करता यावी, यासाठी नव्याने लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना बियाणे, लागवडीचे तंत्र समजावण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून मार्गदर्शन करण्यात आले होते. वेळेत झालेल्या लागवडीनंतर या रोपांची वाढ सध्याच्या समाधानकारक वातावरणात जोमाने होत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक वातावरणामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांद्याचा दर्जा अद्याप शाबूत आहे. जीआय मानांकन मिळाल्यानंतर येथील शेतकऱ्यांचा उत्साह वाढला असून, या पिकाच्या क्षेत्रात वाढ होणार आहे. यातून आर्थिक स्थिती सुधारणार, अशी आशा येथील शेतकरी व्यक्त करत आहेत.

***
बियाण्यांची उपलब्धता ही क्षेत्र वाढवण्यात मुख्य अडचण आहे. यासाठी बियाणे देण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आलेले होते. त्यास प्रतिसाद देत नव्याने लागवड करणाऱ्यांना योग्य प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले होते. भातकापणीनंतर वेळेत वाफे करण्यात आल्याने जमिनीतील ओलावा शाबूत होता. त्यानंतर पडणाऱ्या थंडीमुळे कांद्याला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. उन्हामुळे रोपे करपून जाण्याचा धोका असतो, त्यामुळे गारवा असणे या पिकाला चांगले असते.
- दत्तात्रय काळभोर, कृषी उपसंचालक

जीआय मानांकनामुळे चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा येथील शेतकरी करत आहे. त्यास हवामानाची चांगली साथ मिळत आहे. वातावरणात गारवा असल्याने शिंपण्यासाठी पाणी कमी प्रमाणात लागते. पांढऱ्या कांद्याच्या पिकाबरोबरच येथे तोंडली, वालाचे पीक समाधानकारक आहे.
- गुरुनाथ नाईक, शेतकरी, अलिबाग


हे आहेत फायदे...
* पांढरा कांदा मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. तो नियमित खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
* पांढऱ्या कांद्यात फ्लेव्होनॉइड अँटीऑक्सिडंट असतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात.
* पचनाशी निगडीत समस्यांशी लढण्यास मदत होते. त्याचा सॅलडमध्ये समावेश करू शकता.
* भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रीबायोटिक्स असल्याने पोटासाठी फायदेशीर असतात.
* रोगप्रतिकारशक्ती वाढते.