
वाड्यात भाजपचे ‘निषेध आंदोलन’
वाडा, ता. २ (बातमीदार) : भाजप तालुका शाखेच्या वतीने वाडा तहसील कार्यालयासमोर सोमवारी (ता.२) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत अजित पवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून ते स्वराज्य रक्षक असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून संपूर्ण देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी नैतिकता शिल्लक असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी केली. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, गटनेते मनीष देहेरकर, शुभांगी उत्तेकर, राजेंद्र दळवी, रोहन पाटील, कुणाल साळवी, रिमा गंधे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.