कळवा रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळवा रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर
कळवा रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर

कळवा रुग्णालयातील १२० डॉक्टर संपावर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २ : वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदनिर्मिती करावी, महाराष्ट्रातील सर्व शासकीय पालिका महाविद्यालयात अपुरे व मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी आदी विविध मागण्यांसाठी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील (कळवा) तब्बल १२० निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.

मागील कित्येक वर्षांपासून सरकार निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत आंदोलने, लेखी निवेदन, निर्दशने करूनही मागण्या सुटत नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार सोमवारपासून ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्वच १२० निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले.

संपाची दखल घेत पालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी तसेच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. योगेश शर्मा आदींची तातडीची बैठक पार पडली. या वेळी निवासी डॉक्टरांनी संपातून माघार घेतल्यास, रुग्णांची काळजी घेतल्यास मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालिका आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

शस्त्रक्रिया सुरळित
संपाच्या काळात रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांसह कोविड काळात नेमणूक करण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी ४० डॉक्टरांची तुकडी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेमण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तसेच या संपाच्या काळात ११ शस्त्रक्रिया पार पडल्या असून यामध्ये ५ मोठ्या; तर सहा लघु शास्त्रक्रियांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.