सैन्यदलाप्रमाणे पोलिसांबद्दलही आदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैन्यदलाप्रमाणे पोलिसांबद्दलही आदर
सैन्यदलाप्रमाणे पोलिसांबद्दलही आदर

सैन्यदलाप्रमाणे पोलिसांबद्दलही आदर

sakal_logo
By

मुंबई, ता. २ : महाराष्ट्राचे पोलिस दल देशात सर्वश्रेष्ठ मानले जाते. सैन्य दलातील जवानांबाबत लोकांमध्ये जशी आदराची भावना आहे, तशीच भावना आपल्या पोलिसांप्रतीही आहे. कोरोना काळात डॉक्टर्स, परिचारिका यांच्याप्रमाणे पोलिसांनीही जीवाची पर्वा न करता काम केले. त्यामुळे राज्य पोलिस दल अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र पोलिस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोश्यारी बोलत होते.
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी २ जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस दलाला पोलिस ध्वज प्रदान केला होता. तेव्हापासून २ जानेवारी हा दिवस पोलिस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गोरेगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या मैदानावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलिस महासंचालक रजनीश सेठ, पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच मुंबई पोलिस दलातील ज्येष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी आणि जवान उपस्थित होते.
मागील दहा-वीस वर्षांमध्ये पोलिस दलापुढील आव्हाने वाढली आहेत. सागरी सुरक्षा, नक्षलवादासारखे धोके आहेतच. त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांना अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. राज्य शासन पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी प्रयत्नशील आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलिस भरतीही होत आहे. पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राज्य, तसेच देश अधिक सुरक्षित करावा, असे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी केले. पोलिसांनी आपल्या कृतीतून गीतेतील ‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।’ हे ब्रीद सार्थक केले असल्याचे त्यांनी सांगितले.
---
चित्तथरारक प्रात्यक्षिके
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपालांनी वर्धापन दिनाच्या संचलनाचे निरीक्षण केले आणि त्यांच्याकडून मानवंदना स्वीकारली. संचलनामध्ये मुंबई पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी, निशाण टोळी, महिला पोलिस व बँड पथक सहभागी झाले होते. या वर्षी बँड पथकाकडून स्वतंत्र वादन, कमांडोजतर्फे मौखिक आदेशाविना सशस्त्र कवायत, तसेच श्वानपथकातर्फे गुन्हे अन्वेषण व प्रशिक्षणाची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.