
जुहूतील पंचतारांकित हॉटेलात १२ वर्षीय मुलीचा विनयभंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईतील जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन सुरू असताना एका १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मुलगी तिच्या पालकांसह हॉटेलमध्ये गेली होती. २९ वर्षीय आरोपीही तिथे उपस्थित होता. रविवारी पहाटे तीनच्या सुमारास मुलगी आणि आरोपी डान्स फ्लोअरवर होते. तेव्हा आरोपीने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला. मुलीने याबाबत तिच्या पालकांना माहिती दिल्यावर पालकांनी हॉटेल कर्मचाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी आरोपीला जाब विचारला. त्या वेळी उडवाउडवी करत आरोपीने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून ठेवले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध कलम ३५४ आणि लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.