बेकायदा नोंदणी केलेली वाहने परराज्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा नोंदणी केलेली वाहने परराज्यात
बेकायदा नोंदणी केलेली वाहने परराज्यात

बेकायदा नोंदणी केलेली वाहने परराज्यात

sakal_logo
By

मुंबई, ता. २ ः नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, जळगांवसह राज्यातील इतर आरटीओ कार्यालयांत बीएस-४ वाहनांची बेकायदा नोंदणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी काही वाहने पोलिसांनी जप्त केली; मात्र यातील अनेक वाहने परराज्यांत नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या बेकायदा वाहन प्रकरणाचे औरंगाबाद कनेक्शन असून यामध्ये परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना वगळता कर्मचाऱ्यांवर कारवाई करून प्रकरण सध्या थंडबस्त्यात पडले आहे.
राज्यभरातील विविध आरटीओ कार्यालयांमध्ये सुमारे चारशेहून अधिक वाहनांची बेकायदा नोंदणी झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक वाहने नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, जळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात नंदुरबार येथील सायबर गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून यापैकी काही वाहनांचा शोध लागला आहे. गेल्या वर्षी बनावट वाहन नोंदणी प्रकरणी नंदुरबार आरटीओ अधिकाऱ्यांनी जयसिंग बागुल, कांतीलाल अहिरे या दोन वरिष्ठ लिपिकांना निलंबित केले होते, तर बुलढाण्यात चार लिपिकांसह एका एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू असला, तरी परिवहन विभागातील अंतर्गत चौकशी आणि तपास थंडावल्याने दोषी आरटीओ अधिकाऱ्यांना अभय दिला जात असल्याची चर्चा सध्या परिवहन विभागात सुरू आहे.
----------
आरटीओच्या चुका
- वाहन मालकांची केवळ कागदोपत्री पडताळणी झाली
- बोगस आधार कार्डाचा वापर
- वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र हातोहात देण्यात आले
- वाहनांची पडताळणी झाली नाही
----------
बेकायदा वाहन नोंदणीप्रकरणी विधानसभेतही प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याबाबत आम्ही उत्तर दिले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून अनेकांना नोटिसा बजावल्या आहेत. शिवाय तपास सुरूच आहे.
- विवेक भिमनवार, आयुक्त, परिवहन विभाग