टेंभाडेतील अतिक्रमण समूळ नष्ट करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेंभाडेतील अतिक्रमण समूळ नष्ट करा
टेंभाडेतील अतिक्रमण समूळ नष्ट करा

टेंभाडेतील अतिक्रमण समूळ नष्ट करा

sakal_logo
By

पालघर, २ जानेवारी (बातमीदार) : पालघर नगर परिषद क्षेत्रातील टेंभोडे गावातील ३५० कोटी रुपये किमतीच्या सर्वे नंबर ६७ पैकी ३५ एकर गायरान जमिनीवर नगर सेवक व त्यांच्या नातलगांनी अतिक्रमण केले होते. हे अतिक्रमण काढून टाकरण्याचे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पालघरच्या महसूल विभागाने केलेली कारवाई पूर्ण झाली नव्हती. यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी प्रत्यक्ष पाहणी करून या जमिनीवरील अतिक्रमण पूर्णपणे काढून टाकण्याचे आदेश तहसीलदार सुनील शिंदे यांना दिले.
पालघर तालुक्यात एकूण ५४३ जणांनी विविध गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण निष्कसित करण्यासाठी महसूल विभागामार्फत नोटीसा देण्यात आल्या आहेत. या नोटिसांची मुदत संपत असून ज्या ठिकाणी ही मुदत संपली आहे त्या ठिकाणचे कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. आदेशानुसार पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी शुक्रवारी (३० डिसेंबर) नगरपालिका क्षेत्रातील टेंभोडे गावातील सर्वे नंबर ६७ मधील जमिनीवरील अतिक्रमण काढून टाकले.

-------------
दोन दिवसात पूर्ण कारवाई होणार
या जमिनीवर अतिक्रमण हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश शासनातर्फे देण्यात आले होते. त्यामध्ये शुक्रवारी कारवाई करताना नामधारी करण्यात आली होती. याबाबत दैनिक सकाळमध्ये वृत्त छापून आल्यानंतर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी याची गंभीर दखल घेत सोमवारी (ता. २) सायंकाळी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. येथे लागवडीखाली आणलेले सर्व क्षेत्र तसेच उभारण्यात आलेले विविध कुंपण आदी बाबी तातडीने काढून टाका, असे आदेश दिले. यामुळे अर्धवट झालेले निष्कासित करण्याचे काम येत्या एक-दोन दिवसात तातडीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

--------------------
२४ तासात वीजपुरवठा खंडीत
या जमिनीवर अतिक्रमणधारकांनी कूपनलिका खोदून त्या ठिकाणी परस्पर मोटर पंप बसवून वितरणकडून विजेच्या जोडण्या घेतल्या आहेत. या जोडण्यादेखील महावितरणकडून काढून टाकण्यात याव्यात, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी बोडके यांनी पुन्हा दिले. त्यामुळे महावितरण येत्या २४ तासाच्या आत येथील वीज जोडण्या काढून त्यातील विद्युतपुरवठा बंद करणार असल्याचे सांगण्यात आले.