कोपरवासीयांचा धोकादायक प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरवासीयांचा धोकादायक प्रवास
कोपरवासीयांचा धोकादायक प्रवास

कोपरवासीयांचा धोकादायक प्रवास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वे स्थानक हे गर्दीचे स्थानक असून प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई दिशेला रेल्वे प्रशासनाने नवीन पादचारी पुलाची उभारणी केली आहे. परंतु, आजही अनेक प्रवासी हे पादचारी पुलाचा वापर करण्याऐवजी रेल्वे रूळ ओलांडून जात आहेत. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये म्हणून जीवरक्षक जाळी रुळांच्या बाजूने उभारण्यात आली आहे; मात्र काही ठिकाणी ती बसवण्यात आली नसल्याने प्रवासी या मार्गाचा वापर करत रुळ ओलांडत आहेत.

दिवा आणि डोंबिवली स्थानकामध्ये कोपर रेल्वे स्थानक आहे. मध्य रेल्वे मार्गावरील गर्दीचे आणि महत्त्वाचे स्थानक म्हणून कोपर स्थानक ओळखले जाते. कोपर स्थानकाला जोडून असणाऱ्या अप्पर कोपर स्थानकातून वसई, विरार, पनवेल दिशेला ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. या स्थानकात ठाणे दिशेला पादचारी पूल नसल्याने प्रवासी अनेकदा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून जात होते. यामुळे अनेक अपघात घडून त्यात काहींनी जीव देखील गमावले आहेत.
प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे दिशेला नव्याने पादचारी पुलाची उभारणी केली आहे. ऑगस्ट महिन्यात या पुलाचे काम पूर्ण झाले असून, प्रवाशांनी या पुलाच्या वापरास सुरुवात केली आहे. मात्र केवळ काही प्रवासीच या पुलाचा वापर करत असल्याचे दिसून येते. अनेक प्रवासी आजही रेल्वे रुळ ओलांडून पूर्वेकडील वस्तीत प्रवेश करत आहेत. प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये म्हणून रुळाच्या बाजूने संरक्षक जाळी बसवली आहे. मात्र पादचारी पुलाच्या शेजारीच असलेल्या चाळीत जाणाऱ्या रस्त्यांसाठी असलेल्या मार्गावर ही जाळी बसविण्यात आली नसल्याने अनेक प्रवासी या मार्गाचा वापर करताना दिसतात.
---------------------------------
द्राविडी प्राणायाम नको
जिना चढून उतरण्याचा द्राविडी प्राणायाम नको म्हणून हा शॉर्टकट प्रवासी अवलंबित असले तरी जीवास असणारा धोका पत्करुन हा प्रवास केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी संरक्षक जाळी बसवून रुळांवर येणारा मार्ग बंद करावा, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
---------------------------
फेरा टाळण्‍यासाठी रुळाचा वापर
कल्याण दिशेला तिकीट घर हे पश्चिमेला खाली हलविण्यात आले आहे. तिकीट घरात तिकीट काढल्यानंतर पुन्हा जिना चढून फलाट क्रमांक दोनवर जाऊन मुंबई दिशेकडील गाडी प्रवाशांना पकडावी लागत आहे. हा वळसा टाळण्यासाठी अनेक प्रवासी हे रेल्वे रुळ ओलांडून पश्चिमेकडून फलाट क्रमांक दोनवर जात आहेत.
-----------------------------------------------------
कोपर स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर असलेले तिकीट घर बंद करुन पश्चिमेला खाली ते उभारण्यात आले आहे. प्रवाशांची कशापद्धतीने कसरत होते हे प्रशासनास दिसत नाही का? मुंबई दिशेला पादचारी पूल उभारला आहे. परंतु, त्याच्या उताराची दिशा ही देखील ठाणे दिशेला आहे. प्रवाशांना पुन्हा पाठीमागे वळून वस्तीत जावे लागते. अशा वेळेस प्रवासी हे रेल्वे रुळ ओलांडण्‍याचे धाडस करतात.
-सचिन मेहेर, प्रवासी