तवावासीयांना आरोग्य केंद्राची प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तवावासीयांना आरोग्य केंद्राची प्रतीक्षा
तवावासीयांना आरोग्य केंद्राची प्रतीक्षा

तवावासीयांना आरोग्य केंद्राची प्रतीक्षा

sakal_logo
By

कासा, ता. ३ (बातमीदार) : तवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम चार वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले. या आरोग्य केंद्राची इमारती बांधून तयार आहे. पण वीज जोडणी, पाणी पुरवठा यंत्राणेसह इतर अंतर्गत कामे रखडल्याने हे केंद्र अद्याप सुरू झालेले नाही. या आरोग्य केंद्राअभावी येथील ग्रामस्थांना वैद्यकीय उपचारासाठी इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे हे रुग्णालयातील काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.
तवा प्राथमिक आरोग्य केंद्र हे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना उपचार करण्यासाठी या प्राथमिक आरोग्य केंद्राची मदत होते. तवा परिसरातील पेठ, धामटने, कोल्हान, पिंपळशेत बु., वांगर्जे या गावामधील सतरा ते अठरा पाड्यांतील नागरिकांना उपचारासाठी तवा येथील आरोग्य केंद्राचाच आधार आहे. त्यामुळे सध्या असणारी आरोग्य केंद्राची इमारत अपुरी पडत होती. त्याचा विचार करून सरकारने नवीन इमारतीच्या बांधकामासाठी चार वर्षांपूर्वी एक कोटी पंचवीस लाखाच्या निधी मंजूर केल्यानंतर या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम चार वर्षांपासून सुरू झाले होते. सध्या आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयारी झाली आहे. पण अंतर्गत वीज जोडणी, पाणी पुरवठा यंत्रणेचे काम अजूनही अपूर्ण आहेत. त्यामुळे नवीन इमारतीमध्ये अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाले नसल्याने नागरिकांची मोठी पंचायत होत आहे.
....
सध्याची जागा अपुरी
तवा येथील समाज मंदिरात सद्या हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू असून जागा अरुंद असल्याने तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना रुग्णांवर उपचार करताना मोठी कसरत करावी लागत आहेत. अनेक दुर्गम गावपाड्यातील रुग्ण, तसेच महामार्गावरील अपघातग्रस्तांना या रुग्णालयात दाखल केले जाते. पण येथील जागा कमी पडत असून डॉक्टर कर्मचारी वर्ग यांच्या राहण्याची देखील मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करावे, अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

....
गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या जागेत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे. अनेक दुर्गम भागातून नागरिक उपचारासाठी येथे येत असतात. त्यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झाले पण अंतर्गत कामे रखडल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे लवकरात लवकर हे रुग्णालय सुरु करावे.
-योगेश नम, सचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
..
तवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले असून फक्त पाणी पुरवठ्याचे काम बाकी आहे. जलजीवन योजनेमधून येथे पाण्याची सोय केली जाणार आहे. पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही याबाबत येथे पाहणी केली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील शिल्लक कामे लवकरच पूर्ण करून हे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले जाईल.
- डॉ. दयानंद सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक, पालघर


कासा : तवा येथील आरोग्य केंद्राची इमारत बांधून तयार आहे.