
भुरट्या चोरांची सानपाड्यात दहशत
जुईनगर ता.३ (बातमीदार)ः सुनियोजित शहराचा भाग असलेल्या सानपाडा विभागामध्ये गेल्या काही महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यात भुरट्या चोरांकडून घराबाहेर पडणाऱ्या महिलांना लक्ष्य केले जात असून गळ्यातील मंगळसूत्र, हातातील बांगड्या, पर्स खेचण्याचे प्रकार वाढल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून सानपाडा विभागात चोरीचे प्रकार वाढले आहेत. विभागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून रायन स्कूल, एमटीएनएल कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, नवी मुंबई महापाालिका डी-वार्डकडे जाणारा रस्ता, अष्टविनायक सोसायटीकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्यावरच चोरीचे प्रकार होत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या भुरट्या चोरांकडून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, दागिने, हातामधील मोबाईल, पर्स खेचण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी विविध चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
-----------------------------------
छत्रपती महाराज चौक सानपाडा सेक्टर १० या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणा बसवण्याबाबत पालिकेकडे मागणी केली आहे. तसेच सानपाडा विभागामध्ये अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
-विसाजी लोके, माजी परिवहन समिती सदस्य