भावी पोलिसांचा मैदानावर कस
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ३ ः पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदाच्या २०४ पदासाठी तब्बल १२,३७५ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. या पदांसाठीची भरती प्रक्रिया कळंबोलीतील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू आहे. ही भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याची सर्व व्यवस्था नवी मुंबई पोलिसांनी केली असून पोलिस दलात भरती होण्याचे स्वप्न बाळगून मैदानात उतरलेल्या भावी पोलिसांचा मैदानात कस लागत आहे.
पोलिस दलात सहभागी होऊन देशसेवा करण्याची इच्छा बाळगणारे राज्यभरातील लाखो तरुण-तरुणी वर्षानुवर्षे तयारी करत असतात. अशातच राज्यात २ जानेवारी पासून सुरु झालेल्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातील १८ लाखांपेक्षा अधिक तरुण तरुणींनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. पण त्यातही बहुतेक तरुणांचा ओढा हा मुंबईकडे असल्यामुळे पोलिस भरती निघाल्यानंतर हजारो तरुण मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात धाव घेतात. त्यामुळे विविध जिल्ह्यातून येणाऱ्या या तरुणांना मुंबईत राहणाऱ्या आपल्या नातेवाइकांकडे आसरा घ्यावा लागत आहे. तर, काही तरुणांचे नातेवाईक नसल्याने रस्त्याच्या बाजूला, ब्रीज खाली आसरा घेऊन, अंघोळ पाण्याशिवाय राहण्याची वेळ येते. त्यामुळे अशा तरुणांची होणारी गैरसोय लक्षात घेता नवी मुंबई पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी प्रथमच राहण्याची, टॉयलेट, बाथरूमची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी कळंबोली येथील पोलिस मुख्यालयालगत असलेल्या सिडको मैदानावर मंडप टाकण्यात आला आहे. इतकेच नाही तर मैदानी चाचणीत सहभागी झालेल्या या तरुणांना सकाळी वडापाव आणि केळी सुद्धा पोलिस आयुक्तालयाकडून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यंत शांततेत व सुरळीत भरती प्रक्रिया सुरू असल्यामुळे उमेदवारांमधून समाधान व्यक्त होत आहे.
--------------------------------
पारदर्शक प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा आधार
पोलिस शिपाई भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी मैदानी चाचणीच्या वेळी नवी मुंबई पोलिसांकडून आरएफआयडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. प्रत्येक उमेदवाराला रेडिओ फ्रिक्वेन्सी ओळख देण्यात आले आहे. त्याशिवाय प्रत्येक उमेदवारांच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात येऊन त्यांचा चेहरा स्कॅनिंग करण्यात येत असल्याने पोलिस भरतीत डमी उमेदवार सहभागी होण्याचा प्रकार पूर्णपणे बंद झाला आहे.
------------------------------------
६० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
मैदानी चाचणी अधिक पारदर्शक पद्धतीने व्हावी, यासाठी पोलिस मुख्यालयातील मैदानावर प्रत्येक टप्प्यावर ६० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याशिवाय २० हॅन्डीकॅमद्वारे मैदानी चाचणीची व्हिडीओग्राफी करण्यात येत आहे. मैदानी चाचणीत प्रत्येक टप्प्यावर उमेदवारांचे शूटिंग करण्यात येत असल्याने तसेच त्यांच्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असल्यामुळे मैदानी चाचणी अंत्यत पारदर्शक पद्धतीने होत आहे.
------------------------------------
३०० पोलिसांचा बंदोबस्त
या मैदानी चाचणीसाठी सुमारे ३०० पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून उमदेवारांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी तैनात असलेल्या पोलिसांकडे वॉकीटॉकीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय मैदानी चाचणीत एखाद्या उमेदवाराला काही दुखापत किंवा अत्यवस्थ वाटू लागल्यास त्यांच्यासाठी खास कार्डीयाक अॅम्ब्युलन्सची तसेच डॉक्टरांच्या टीमची व्यवस्था करण्यात आली आहे.
---------------------------------------
उमेदवारांच्या बॅगसाठी विशेष व्यवस्था
मैदानी चाचणीसाठी येणाऱ्या उमेदवारांचे बॅग व त्यांच्या वस्तु सुरक्षित रहावेत यासाठी देखील पोलिस आयुक्तालयाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. उमेदवारांनी पोलिस मुख्यालयाच्या मैदानात प्रवेश केल्यानंतर त्या उमेदवारांच्या बॅगला टॅग लावण्यात येऊन ती बॅग सुरक्षित ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आपली बॅग हरविण्याची भीती राहणार नाही, तसेच त्यांना निश्चितंपणे मैदानी चाचणीत सहभागी होता येणार आहे.
----------------------------------
सौजन्याने वागण्याच्या सूचना
पोलिस भरतीसाठी येणारे उमेदवार झेरॉक्स, प्रिंटआऊट काढण्यासाठी बाहेर भटकू नयेत यासाठी त्यांना पोलिस मुख्यालयातच अत्यंत वाजवी दरात झेरॉक्स, प्रिन्ट आऊट काढण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्यासाठी वायफायची सुविधा नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच भरतीसाठी येणारे तरुण हे विविध जिल्ह्यातून येत असल्याने त्यांच्यासोबत उद्धटपणे वर्तन न करता सौजन्याने वागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
---------------------------------
दोन दिवसात १,१९० उमेदवारांची चाचणी
नवी मुंबई पोलिसांनी पहिल्या दिवशी ७०० उमेदवारांना कळंबोली येथील पोलिस मुख्यालयात मैदानी चाचणीसाठी बोलावले होते. मात्र, त्यापैकी फक्त ३६९ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ५३ उमेदवार उंची, छाती आणि कागदपत्र पडताळणीत बाद झाले. त्यानंतर उर्वरित ३१६ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी १२०० उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात आले होते, त्यापैकी ८३१ उमेदवार हजर झाले. त्यापैकी ४३ उमेदवार बाद झाल्यानंतर उर्वरित ७८९ उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली.
------------------------------------
सध्या पुरुष उमेदवारांची मैदानी चाचणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेण्यात येत आहे. तसेच १२ व १३ जानेवारीला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. परराज्यातून पोलिस भरतीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
-संजय पाटील, पोलिस उपायुक्त (मुख्यालय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.