
सावित्रीबाईंच्या समर्पित कार्यामुळे महिला सक्षमीकरण
कासा, ता. ३ (बातमीदार) : चातुर्वण्य समाजरचनेत स्त्रियांना शूद्र समजले जायचे. महात्मा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवून त्यांना प्रथम शिक्षक केले. शाळेच्या शिक्षिका, मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाईंनी स्री शिक्षणाचा पाया घातला. सावित्रीबाई फुले यांच्या समर्पणामुळेच आज महिला प्रत्येक क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी करताना दिसतात. त्यांच्यामुळेच आज खऱ्या अर्थाने महिला सबलीकरण झाले आहे, असे प्रतिपादन प्राचार्य भगवानसिंग राजपूत यांनी केले.
कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात मंगळवारी (ता. ३) सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी प्राचार्य राजपूत बोलत होते. सत्यशोधक आद्य मुख्याध्यापिका, समाजसेविका अशा विविध क्षेत्रांत ज्यांचे नाव अजरामर आहे, सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्यासोबत सत्यशोधक समाज सुधारक चळवळीत सहभागी होऊन काम केले. अशा सावित्रीबाईंच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. भगवानसिंग राजपूत यांनी प्रतिमा पूजन केले. या वेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. अर्जुन होन, सहकारी प्रा. साळवे, प्रा. दीपक वाकडे, प्रा. रितेश हटकर, प्रा. माने. प्रा. दबडे उपस्थित होते. राज्यशास्त्राच्या प्रा. अनवरी खान यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा विविध दाखले देऊन आढावा घेतला. याप्रसंगी प्रा. सुजाता गावित प्रा. रंजना शणवार, प्रा. शेफाली गहला, प्रा. हर्षाली दुबळा उपस्थित होत्या.