
मुख्य रस्त्यालगतच्या टपऱ्या जमीनदोस्त
बोईसर, ता. ३ (बातमीदार) ग्रामपंचायतीने सोमवारी रात्री मुख्य रस्त्यावरील टपऱ्यांवर कारवाई करत त्या जमीनदोस्त केल्या आहेत. वाहतूक कोंडी होत असल्याने या टप्प्यावर ग्रामपंचायत बोईसरकडून तोडक कारवाई करण्यात आलेली असून उपसरपंच निलम संखे व ग्रामविकास अधिकारी कमलेश संखे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
शहरातील फेरीवाल्यांना प्रत्यक्ष भेटून रस्त्यालगत असलेले टपऱ्या, दुकाने काढून घेण्याचे आवाहन केले होते. परंतु त्या फेरीवाल्यांनी नागरिकांना होणारी अडचण लक्षात न घेतल्यामुळे कारवाई करण्यात आलेली असून उर्वरित कारवाई देखील लवकरच केली जाईल, असे निलम संखे यांनी सांगितले. तर दिवसा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्री कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच या सर्व फेरीवाल्यांना आठवड्यांपूर्वी तोंडी कळविले होते, असे कमलेश संखे यांनी सांगितले.