
कर्तव्यदक्ष पोलिसांची आरोग्य तपासणी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : सण, उत्सव असो किंवा इतर काही कार्यक्रम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र पोलिस कर्तव्य बजावत असतात. नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणाऱ्या पोलिसांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक असल्याने महात्मा फुले चौक पोलिसांनी सोमवारी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. पोलिस ठाण्यातील सुमारे १२५ पोलिसांनी या वेळी आरोग्य तपासणी करून घेतली.
कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करताना, गुन्ह्यांचा तपास, आंदोलने, मोर्चे, व्हीआयपींचे दौरे, गस्त, सण, नवीन वर्षाचा जल्लोष यामुळे पोलिस समाजाचे रक्षण करण्यासाठी २४ तास कर्तव्य निभावत असतात. या कारणाने त्यांना आरोग्याची काळजी घेता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून यंदा कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक हुनमाणे यांही पोलिस ठाण्यातच युनिकेअर हेल्थ सेंटर यांनी मदतीने आरोग्य शिबिर आयोजित केले. या शिबिरात जवळपास १२५ पोलिसांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी करत आरोग्याची काळजी घेण्याचे ठरवले. ३१ डिसेंबर व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी चोवीस तास तैनात असलेल्या पोलिसांनी या उपक्रमाचे स्वागत केले.