
भिवंडीत ‘कपडा थैली के साथ बाजार’ अभियान
भिवंडी, ता. ४ (बातमीदार) : भिवंडीतील बीएनएन महाविद्यालयाचा सायन्स क्लब आणि भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे पर्यावरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील धामणकरनाका येथील भाजीमार्केटमध्ये ‘कपडा थैली के साथ बाजार’ अभियान राबवून नागरिकांमध्ये जागृती करण्यात आली.
प्लास्टिक पिशवी विघटन होत नसल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होत आहे. याची जाणीव नागरिकांमध्ये करण्यासाठी १ जानेवारीपासून बीएनएन महाविद्यालयातील सायन्स क्लब आणि भिवंडी-निजामपूर महापालिकेचे पर्यावरण विभाग यांच्यामार्फत ‘कपडा थैली के साथ बाजार’ अभियानास सुरुवात केली आहे. या अभियानासाठी बीएनएन महाविद्यालयातील डॉ. दिलीप काकविपुरे आणि प्रा. पुंडलिक वारे यांनी पद्मनागनर भाजी मार्केट येथील ग्राहकांना नि:शुल्क कापडी पिशव्या भेट दिल्या. शालू सरोज, प्रीती वर्मा, समृद्धी वारे आणि खुशी वारे या सायन्स क्लबच्या स्वयंसेवकांनी प्लास्टिक बंदीवर नृत्य करून उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधले. चंद्रजीत यादव आणि बालाजी सूर्यवंशी यानी ‘टिक टिक टिक, कसम ये खाये रे’ हे कापडी थैली वापरण्यासाठीचे आवाहन गीत सादर केले. महापालिका आणि सायन्स क्लबच्या स्वयंसेवकांच्या आवाहनाला मार्केटमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन सचिन जाधव, प्राचार्य डॉ. अशोक वाघ, जैन रसायनशास्र विभागप्रमुख डॉ. कल्पना पाटणकर आणि शशिकांत पतंगे यांनी केले. याप्रसंगी पालिका पर्यावरण विभागाचे नीतेश चौधरी उपस्थित होते.