
सहाय्यक आयुक्तांना द्यावा लागणार अहवाल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : अनधिकृत बांधकामांचा विषय हा ठाणेकरांना काही नवीन नाही. पालिका हद्दीतील मुंब्रा येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याने एका दक्ष नागरिकाने सहायक आयुक्तांच्या छायाचित्रासह महापालिका मुख्यालयासमोर बांधकामांचे जीपीआरएस लोकेशनसह फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामांच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात पालिका प्रशासनदेखील खडबडून जागे झाले असून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने संबंधित सहायक आयुक्त यांना या बांधकामावरील कारवाईचा अहवाल सादर करण्याचे तोंडी आदेश दिले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीत दिवसेंदिवस अनधिकृत बांधकांचे पेव मोठ्या प्रमाणत फुटले आहे. या अनधिकृत बांधकामांवरून अनेकदा लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनामध्ये खटकेदेखील उडाले आहेत. स्थायी समिती बैठक असो वा सर्वसाधारण सभेच्या सभागृहातदेखील याविरोधात नगरसेवकांकडून आवाज उठवला जात होता; मात्र त्यानंतरदेखील पालिका प्रशासनाकडून नामधारी कारवाई करण्यात आली. या सर्व बांधकामांवर ठोस कारवाई होत नसल्याने ही बांधकामे पुन्हा नव्याने उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. अशातच अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून १४ आजी, माजी सहायक आयुक्तांची चौकशी सुरू असल्याचेच पालिकेकडून उत्तर मिळत आहे; मात्र त्यावरदेखील ठोस अशी कारवाई होताना अद्यापही दिसून आले नाही. त्यातच आता मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामे उभी राहत असून त्यावर कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची गंभीर बाब पालिका मुख्यालयासमोर लावण्यात आलेल्या फलकावरून समोर आली आहे.
.............................
बदली करून प्रकरणावर पडदा
एखाद्या प्रभाग समितीत अनधिकृत बांधकाम होत असेल, तर त्याला प्रथमदर्शनी सहायक आयुक्त हाच जबाबदार मानला जातो. त्यानुसार त्याच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे; मात्र महापालिकेकडून केवळ अशा सहायक आयुक्ताची बदली करून हे प्रकरण थंड बस्त्यात गुंडाळले जात असल्याचे अनेकदा दिसून येत आहे.