
फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस अटक
अंधेरी, ता. ४ (बातमीदार) ः सुमारे ७२ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी राघवेंद्र हरिश्वर पुजारी या मुख्य आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. फ्लॅट खरेदी-विक्रीचे बोगस दस्तावेज बनवून त्याने एलआयसीकडून कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे. निखिल अंबू गोलाणे हे चालक म्हणून काम करतात. ते सध्या त्यांची वयोवृद्ध आई, पत्नी आणि मुलांसोबत कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, म्हाडा, आकुर्ली गोल्डन पॅलेस अपार्टमेंटमध्ये राहतात. हा फ्लॅट त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. याच फ्लॅटसंदर्भात ही फसवणूक झाली होती. हा प्रकार उघडकीस येताच निखिल गोलाणे यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. याच गुन्ह्यात सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या राघवेंद्र पुजारीला समतानगर पोलिसांनी अटक केली.