अंगारक चतुर्थीनिमित्त ‘सिद्धिविनायक’च्‍या दिनक्रमात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगारक चतुर्थीनिमित्त ‘सिद्धिविनायक’च्‍या दिनक्रमात बदल
अंगारक चतुर्थीनिमित्त ‘सिद्धिविनायक’च्‍या दिनक्रमात बदल

अंगारक चतुर्थीनिमित्त ‘सिद्धिविनायक’च्‍या दिनक्रमात बदल

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ ः श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्‍यासातर्फे मंगळवारी (ता. १०) अंगारक संकष्‍ट चतुर्थीनिमित्त दिनक्रमात बदल केला आहे. दरम्‍यान पहाटे १२.१० ते १.३० दरम्‍यान काकडआरती व महापूजा होईल. त्‍यानंतर पहाटे ३.१५ ते ३.५० पर्यंत आरती होईल. यादरम्‍यान सोमवारी मध्‍यरात्री १.३० ते पहाटे ३.१५ पर्यंत व ३.५० ते दुपारी १२ पर्यंत दर्शनाची वेळ आहे. त्‍यानंतर दुपारी १२.५ ते १२.३० पर्यंत नैवेद्य दाखवला जाईल व नंतर सायंकाळी ७.३० पर्यंत भाविकांना ‘श्रीं’च्‍या दर्शनाचा लाभ मिळेल. सायंकाळी ७ वाजता दर्शनादरम्‍यानच धुपारती होईल. त्‍यानंतर ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत श्रींची महापूजा, नैवेद्य व आरती होईल. रात्री ११.३० वाजता रिद्धि व सिद्धि प्रवेशद्वार बंद केले जातील. त्‍यानंतर मंदिरात असलेल्‍या भाविकांचे दर्शन झाल्‍यावर शेजारती होऊन मंदिर बंद केले जाईल, असे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्‍यासातर्फे सांगितले गेले आहे.

श्रींच्‍या दर्शनासाठी सुविधा
श्री सिद्धिविनायक संकेतस्‍थळावरून व ॲपद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे. पुरुषांसाठी रचना संसद येथून प्रवेश व महिलांसाठी सिल्‍व्‍हर अपार्टमेंट येथून प्रवेश दिला जाईल. विकलांग, गरोदर महिला, वयोवृद्ध यांना एस. के. बोले मार्ग येथील पदपथावर उभारलेल्‍या मंडपातून प्रवेश दिला जाईल. तसेच दुरून श्रींच्‍या दर्शनाची व्‍यवस्‍था आगर बाजार येथून एस. के. बोले मार्ग व श्री सिद्धिविनायक सोसायटीच्‍या प्रवेशद्वारातून केली आहे. रांगेकरिता मंडप व रेलिंगची व्‍यवस्‍था आहे. मंदिरातर्फे रुग्‍णवाहिका, पाणपोई तसेच महापालिकेकडून मोबाईल टॉयलेटची व्‍यवस्‍था केली गेली आहे.

न्‍यासचे आवाहन
दर्शनासाठी येताना भाविकांनी आपले मोबाईल फोन बंद ठेवावेत, तसेच अन्‍य इलेक्‍ट्रॉनिक वस्‍तू (कॅमेरा, लॅपटॉप, टॅब) सोबत आणू नये, असे आवाहन न्‍यासने केले आहे.