हातनदी पूल वाहतुकीस धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हातनदी पूल वाहतुकीस धोकादायक
हातनदी पूल वाहतुकीस धोकादायक

हातनदी पूल वाहतुकीस धोकादायक

sakal_logo
By

बोईसर, ता. ४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गाहून मनोरला जोडणारा एकमेव आणि महत्त्वाचा हातनदीवरचा पूल जीर्ण झाला असून तो वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मनोर-पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर या रस्त्याचे मजबुतीकरण झाले आहे. असे असले तरी या रस्त्यावरील हातनदी पूल, तसेच वळण असुरक्षित असून ते धोकादायक आहे. त्यामुळे येथे नव्याने पूल मंजूर व्हावा, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

हातनदी पुलामुळे पालघर, तसेच मनोरसह आजूबाजूच्या तब्बल ४० ते ५० हून अधिक गावांचा संपर्क जोडला गेला आहे. पालघर जिल्हा मुख्यालयालाही याच पुलावरून जावे लागते. पालघर तालुक्यातील पालघर आणि मनोरनजीकच्या ४० गावांना मुंबई-अहमदाबाद महामार्ग गाठण्यासाठी पालघर-मनोर मार्गावरील हातनदी (नांदगाव) पुलावरून एकमार्गी वाहतूक केली जाते. मनोरनजीकच्या तामसई, पोचाडे, घरत पाडा, नेटाली, गोवाडे, कोंडगाव, कोंढाण, बांधन मासवणसह महामार्गाच्या पूर्वेकडील गावांची वाहतूक हातनदी पुलावरून केली जाते. तब्बल ४०हून अधिक गावांचा भार या पुलावरून वाहिला जात आहे. तसेच अवजड वाहनांची या पुलावरून दिवस-रात्र वाहतूक सुरू असते. पुलाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांकडून होत आहे.

---------------------
अपघाताची भीती
हातनदीच्या या पुलावरील संरक्षक कठड्याचे पाईप तुटलेले आहेत. तसेच पथदिव्यांची व्यवस्था नाही. पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. पुलाचे स्लॅब निखळलेले आणि संरक्षक कठडेही तुटलेले आहेत. त्यामुळे वाहनांना अपघात होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

-----------------
रस्त्यावर धोकादायक वळण
मनोर-पालघर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला आहे. रस्त्याचे मजबुतीकरण झाले असले तरी या रस्त्यावरील हातनदी पूल व वळण, मनोर-पालघर-गोवाडे घाट व वाघोबा घाट असुरक्षित आहेत. या धोकादायक रस्त्यावर कोणतेही सूचनाफलक नाही.
मनोर पालघर मुख्य रस्ता फक्त १८ किलोमीटर असताना घाट वळणक्षेत्र व एकतर्फी रस्ता आल्याने वाहनांच्या रांगा लागत असतात.

---------------------
जुन्या पुलाची किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे. पुलातील दगडांमध्ये उगवलेली लहान-मोठी झाडे काढून डागडुजी केली जाणार आहे. शिवाय प्लास्टर करून रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
- विशाल मनाले, कनिष्ठ अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

----------------------
हातनदी पुलावरून दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. याचा भार पुलावर पडून अपघात होण्याची भीती आहे. यासाठी जुन्या पुलाच्या बाजूला अजून एक नवीन पूल होण्याची गरज आहे.
- संतोष जनाठे, सरचिटणीस भाजप, पालघर