झोपड्यांच्या बेकायदा हस्तांतराला चाप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपड्यांच्या बेकायदा हस्तांतराला चाप
झोपड्यांच्या बेकायदा हस्तांतराला चाप

झोपड्यांच्या बेकायदा हस्तांतराला चाप

sakal_logo
By

भाईंदर, ता. ४ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील झोपड्यांना लावण्यात आलेला मालमत्ता कर हस्तांतर करण्याचा निर्णय महापालिकेकडून लवकरच घेतला जाणार आहे. यासंदर्भातला सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आयुक्तांनी प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. सध्या झोपड्यांचा कर हस्तांतर केला जात नाही. त्याचबरोबर या हस्तांतर शुल्कात वाढही केली जाणार आहे. या निर्णयामुळे महापालिकेचे उत्पन्न तर वाढणार आहेच शिवाय झोपड्यांचे बेकायदेशीर होणाऱ्‍या हस्तांतरणालाही चाप बसणार आहे.
शहरातील झोपडपट्ट्यांना लावण्यात आलेल्या मालमत्ता कराचे झोपड्यांची खरेदी विक्री झाल्यानंतर हस्तांतरण करणे महापलिकेने गेल्या अनेक वर्षांपासून बंद केले आहे. शहरातील बहुतांश झोपड्या सरकारी जागेवर आहेत. त्यामुळे झोपड्यांच्या खरेदी विक्री व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नाही. या व्यवहारांच्या करारनाम्याची नोंदणी देखील होत नाही. कोणत्याही मालमत्तेचा नोंदणीकृत करारनामा असेल तरच महापालिका ती मालमत्ता खरेदी करणाऱ्‍याच्या नावावर हस्तांतर करते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून झोपड्यांचा कर हस्तांतर केला जात नव्हता. यात महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मध्यंतरी महासभेने झोपड्यांच्या मालमत्ता कराचे हस्तांतर पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. पण या निर्णयाची आयुक्तांनी अंमलबजावणी सुरू केली नव्हती.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारकडून मालमत्ता कारचे उत्पन्न वाढविण्याच्या सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. उत्पन्न वाढवले नाही तर पंधराव्या वित्त आयोगाच्या नुदानावर पाणी सोडावे लागणार आहे. अनुदान मिळाले नाही तर शहरातील अनेक विकास कामे ठप्प होतील. त्यामुळे कराचे उत्पन्न विविध मार्गाने वाढविण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. शहरात छोट्या मोठ्या पस्तीसहून अधिक झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे झोपड्यांचा कर हस्तांतर केला तर त्यातून महापालिकेला मोठे उत्पन्न मिळणार आहे. कर हस्तांतरणासोबतच हस्तांतरण शुल्कातही वाढ केली जाणार आहे. याआधी कर हस्तांतरणासाठी पाचशे रुपये शुल्क आकारले जात होते आता ते किमान दोन हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.

असा बसणार आळा
झोपड्यांचा कर हस्तांतर होत नसल्यामुळे त्याचे बेकायदेशीर मार्गाने हस्तांतरण केले जाते. झोपडपट्टीधारकाला अनेक सुविधांचा लाभ घेण्यासाठी झोपडी नावावर असणे आवश्यक असते. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्‍यांना हाताशी धरुन मालमत्ता करधारकाच्या नावात गैर मार्गाचा अवलंब करून बदल केले जातात. महापालिकेने अधिकृतपणे हस्तांतरण सुरू केले तर या गैरप्रकारांना आपोआपच आळा बसणार आहे. मात्र कर हस्तांतर करताना तो कर जमीन ज्याच्या नावावर आहे, त्याचा नावावर हस्तांतर होणार असून झोपडीत राहणाऱ्‍याचे नाव कराच्या देयकावर भोगवटाधारक म्हणून समाविष्ट होणार आहे.


महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी झोपड्यांचा कर हस्तांतर करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. त्याचा संपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रशासक म्हणून आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. आयुक्तांची मान्यता मिळाली की त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
- संजय शिंदे, उपायुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका