
पालघरमध्ये सावित्रीच्या लेकींचा गुणगौरव
पालघर, ता. ४ (बातमीदार) : मुलींच्या संगोपनाबरोबरच त्यांचे शिक्षणही महत्वाचे असून पालघर जिल्ह्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याबाबत पालकांनीसुद्धा जागृत असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालघर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांनी केले. क्रांतीज्योती प्रतिष्ठान पालघर आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ता सावित्रीच्या लेकी सन्मान सोहळा पंचायत समिती सभागृह पालघर येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी संगीता भागवत होत्या. सोहळ्याचे उद्घाटन पालघर पंचायत समितीच्या सभापती शैला कोलेकर करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष निलेश भोईर, सचिव संघमित्रा भोईर, पालघर- ठाणे माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालिका प्रगती पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
-------------------
महिलांचा सन्मान
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या नमिता राऊत (बोईसर), अनिता वाढाण (पालघर), आश्लेषा माने (तारापूर), हेमलता ठाकूर (मनोर), नूतन राऊत (केळवे), अश्विनी बिराजदार (वसई), आशा निकम (सफाळे), प्रज्ञा ठाकूर (पालघर), शुभांगी पाटील (पालघर), संगीता चौधरी (डहाणू); तर उद्योग क्षेत्रातील कल्याणी बनसोडे, दर्शना पाटील (तारापूर), कृषी क्षेत्रातील हर्षाली माळी, व्यावसायिक क्षेत्रातील वैशाली डोहाळे, आरोग्य क्षेत्रातील कांचन ठाकरे, प्रमिला मानकर, पत्रकार विभागातून विभूती मिस्त्री, नीता चौरे या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सावित्रीच्या लेकी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रांतीज्योती प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश भोईर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जतिन कदम यांनी; तर मिलिंद चुरी यांनी आभार मानले.