संपामुळे मोखाड्यात अंधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संपामुळे मोखाड्यात अंधार
संपामुळे मोखाड्यात अंधार

संपामुळे मोखाड्यात अंधार

sakal_logo
By

वसई, ता. ४ (बातमीदार) : महावितरण कर्मचारी संपाच्या पहिल्याच दिवशी पालघर जिल्ह्यात किरकोळ ठिकाणी तांत्रिक बिघाडामुळे वीज काही वेळ खंडित झाली होती. तर मोखाड्यात मात्र अंधार झाला होता. त्यामुळे बँकेचे व्यवहार, इंटरनेट सेवेअभावी बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. तर दुसरीकडे महावितरणकडून ग्राहकांच्या सुविधेसाठी २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आला आहे.
महावितरणमधील कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांच्या विविध संघटनांनी खासगीकरणाविरोधात बुधवारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांचा संप पुकारला होता. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक तयारी मुख्य अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. वाडा, वसई आणि पालघर या मंडळ कार्यालयात संप काळासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. वीजपुरवठा बाधित होणे, अपघात, वीज यंत्रणेचे नुकसान याची माहिती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून नागरिक माहिती देऊ शकतात असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. या संपात सहभागी असणारे कर्मचारी, अभियंते, अधिकारी याशिवाय देखभाल-दुरुस्तीसाठी असणाऱ्या एजन्सीसह इतर कंत्राटदारांचे कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्या मदतीने संप काळात वीजपुरवठा अबाधित ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे मोखाड्यासह इतर किरकोळ घटना वगळता, अन्य ठिकाणी मात्र वीज पुरवठा सुरळित होता.
-------------
वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी जे कर्मचारी संपात सहभागी नाहीत ते काम करत आहेत. पालघर जिल्ह्यात वीज खंडित होण्याच्या घटना किरकोळ स्वरूपात झाल्या आहेत. मात्र त्वरित वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. जर ग्राहकांना अडचण आली तर त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
- विजय दूधभाते, जनसंपर्क अधिकारी, महावितरण
--------------------
मोखाड्यात व्यवहार ठप्प
मोखाडा (बातमीदार) : कर्मचारी संपाचा मोठा फटका मोखाडा तालुक्याला बसला. मोखाडा तालुक्याचा विद्युतपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. त्यामुळे विजेवर चालणारे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत. तसेच तालुक्यातील इंटरनेट सेवा देखील कोलमडली आहे. त्याचा परिणाम बॅंकेच्या व्यवहारांवर झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले असून संपूर्ण मोखाडा तालुका अंधारात बुडाला आहे. या विजेच्या संकटामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
--------------
जव्हारहून येणारा विद्युतपुरवठा रात्रीपासून खंडित झाला होता. त्यानंतर तो पुन्हा सुरळीत झाला होता. मात्र, त्यानंतर कर्मचारी संपावर गेल्यानंतर पुन्हा हा विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. याचा परिणाम मोखाडा तालुक्यावर झाला आहे.
- किरण थाटे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, मोखाडा
-------------------
पालघर ठिय्या आंदोलन
पालघर (बातमीदार) : महावितरण विभाग कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा परिणाम पालघर तालुक्यात झाल्याचे दिसून आले. येथील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पालघर विभागीय कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. महावितरणच्या भांडूप कार्यक्षेत्रात अदानी वीज कंपनीला वितरण परवाना देऊ नये आणि खासगीकरणाविरोधात महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे.
महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपन्यांतील खासगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी कंपनीला समांतर वीज वितरण परवाना देऊ नका, कंत्राटी आऊट सोर्सिंग आणि सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त जागा भरा, महावितरणमधील २०१९ नंतरचे उपकेंद्र कंपनीमार्फत चालवा, आदी मागण्या यावेळी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केल्या.
------------------
महावितरण कंपनीला ज्या ठिकाणी मोठा महसूल मिळतो अशा ठिकाणी अदानी कंपनीने वीजपुरवठासाठी परवान्याची मागणी केली आहे. डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर अशा ठिकाणी परवानगी दिल्यास महावितरण कंपनी डबघाईला येईल. याचा आम्ही निषेध नोंदवतो.
- लक्ष्मण राठोड, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता संघटना

...
बोर्डी कार्यालयात शुकशुकाट
बोर्डी (बातमीदार) : वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी संपामुळे महावितरण कार्यालयात शुकशुकाट होता. उप अभियंत्यांसह एकही कर्मचारी कार्यालयात हजर नसल्याचे दिसून आले. पण या भागातील वितरण कंपनीचा वीज पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती वीज उपकेंद्राचे यंत्रचालक (ऑपरेटर) सुचित पाचलकर यांनी दिली.