
थंडीतील हंगामी फळांचा बहर
वाशी,ता.४ (बातमीदार) ः राज्यात सर्वत्र थंडी पडण्यास सुरुवात झाली असल्याने शेतमालासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे थंडीतील पिकांसाठी उत्तम वातावरण असल्याने पिकांची आवकही वाढली आहे. सध्या बाजारात स्ट्रॉबेरी, अंजिरांची आवक वाढली असून आंबडगोड द्राक्षांची आवक देखील सुरु झाली आहे.
बाजार या हंगामी फळांनी बहरून गेला आहे. थंडी वाढू लागल्याने स्ट्रॉबेरीला चांगलाच बहर येऊ लागला आहे. परिणामी वाशीच्या घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून दरही नियंत्रणात आले आहेत. त्यातही महाबळेश्वर पाठोपाठ नाशिकच्या स्ट्रॉबेरीला पसंती मिळत आहे. बाजारात सध्या महाबळेश्वर तसेच नाशिकमधून स्ट्रॉबेरीचे आठ ते दहा पिकअप येत आहेत. येणाऱ्या स्ट्रॉबेरीची चव गोड असल्याने घाऊक बाजारात उत्तम दर्जाच्या स्टॅ्राबेरीचा एक बॉक्स ३५ रुपयांपासून ४० ते ५० रुपये, एक नंबर स्ट्रॉबेरीचा बॉक्स ३० ते ३५ रुपये आणि दोन नंबरचा स्ट्रॉबेरीचा बॉक्स २० ते २५ रुपयांत उपलब्ध आहे. घाऊक बाजारात सध्या ४० ते ५० क्विंटल अंजिराची आवक दररोज होत आहे. आता बाजारात आंबट गोड द्राक्षांची आवक सुरु झाली आहे. त्यांचा हंगाम वाढवण्यास थोडा उशीर आहे.
--------------------------------
लग्नसराईमुळे मागणी
सध्या आईस्क्रीम, केक, मिल्कशेक आणि लग्नसराई असल्याने बांसुदी बनवण्यासाठी स्ट्रॉबेरीला विशेष मागणी आहे. तसेच अंजिराचा हंगाम असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात अंजीर पहायला मिळत आहेत.