
भिकाऱ्यांची आश्रयस्थाने रडारवर
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ४ ः शहरातील उड्डाण पुलांखाली संसार थाटून शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा घालणाऱ्या भिकाऱ्यांची आश्रयस्थाने नष्ट करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. सानपाडा उड्डाण पुलाखाली सुशोभीकरण आणि खेळण्याचे मैदान महापालिकेने तयार करण्याचे ठरविले आहे. त्याला स्थानिक नागरिकांकडून मिळत असणारी पसंती पाहता शहरातील सर्वच उड्डाण पुलांखालील जागा महापालिकेतर्फे सुशोभित केली जाणार आहे.
स्वच्छता सर्वेक्षणासाठी पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. याआधीच्या स्पर्धेत शहरातील विकासकामांसोबत सौंदर्यीकरणावर पालिका प्रशासनाने भर दिला होता. सार्वजनिक जागेतील पडीक भितींवर रंगकाम करून जिवंतपणा आणण्याचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर संपूर्ण शहरातील भिंतींवर रंगांच्या छटा अवतरल्या. महापालिकेतर्फे कल्पक आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी काढलेली चित्रे अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. त्यासोबतच काही ठिकाणी पालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटलाही अधिक प्रमाणात पसंती मिळाली. यादरम्यान, उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागांवर भिकाऱ्यांनी केलेले उपद्रव प्रामुख्याने दिसून आले. रस्त्यावर सिग्नलवर रंगीबिरंगी फुगे, लहान मुलांची खेळणी, तसेच घरातील साहित्य विक्री केल्यानंतर उड्डाण पुलाखाली हे कुटुंब राहतात. त्याच ठिकाणी जेवण करतात. अंघोळ आणि कपडे बदलतात. उड्डाण पुलाखालीच बऱ्याचदा नैसर्गिक विधी करीत असल्यामुळे दुर्गंधीचा रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. शहराच्या सौंदर्याला बाधा ठरणाऱ्या या घटकांना हद्दपार करण्यासाठी महापालिकेतर्फे प्रातिनिधिक स्वरूपात सानपाडा उड्डाण पुलाखाली खेळाचे मैदान तयार करण्यात आले. त्याला अनेक लोकांनी चांगली पसंती दर्शवली. त्यामुळे आता अभियांत्रिकी विभागातर्फे सर्वच उड्डाण पुलांखालील मोकळ्या जागांवर सुशोभीकरण करण्याचे निश्चित केले आहे. टप्प्याटप्प्याने हे विकास काम केले जाणार आहे.
----------------------------
विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण
उरण-जेएनपीटी महामार्गावर महापालिका मुख्यालयाजवळच्या उड्डाण पुलाखाली लाल माती टाकण्याचे काम सुरू केले आहे. या ठिकाणी डोळ्यांना सुखावणारी आणि दूषित हवा शुद्ध करणाऱ्या रोपट्यांची लागवड केली जाणार आहे. त्याप्रमाणेच सायन-पनवेल महामार्गावरील सीबीडी उड्डाणपूल, नेरूळ एलपी पूल, वाशी सेक्टर १७ समोरील पूल, सिवूड्स एल ॲण्ड टी पूल, कोपरी गावाचा पूल, एमआयडीसीतील काही पुलांखालील जागा सुशोभित केल्या जाणार आहेत. या मोकळ्या ठिकाणी उद्यान, रंगकाम आणि विद्युत रोषणाईद्वारे सौंदर्यीकरण होणार आहे.
-----------------------------------
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहराचे सुशोभीकरणासोबत सौंदर्यीकरणावर भर दिला आहे. त्याअंतर्गत उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागांमध्ये नागरिकांना विरंगुळा होईल असे उपक्रम तयार केले जात आहेत. जेणेकरून या जागांचा गैरवापर होणार नाही.
- संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका