१५ मिनिटात तिघांना लुटले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१५ मिनिटात तिघांना लुटले
१५ मिनिटात तिघांना लुटले

१५ मिनिटात तिघांना लुटले

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : नवी मुंबईत सोनसाखळी चोरांची दहशत पुन्हा वाढली आहे. मंगळवारी सकाळी अवघ्या १५ मिनिटांत या लुटारूंनी ऐरोली परिसरातील तीन व्यक्तींच्या अंगावरील दागिने लुटल्याचा प्रकार घडल्याने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये दहशत आहे.
ऐरोली सेक्टर- १९ मधील कलशपार्क इमारतीत राहणारे विजय नलवडे (४७) हे मंगळवारी सकाळी ६.३० वाजता मुलीला सोसायटीच्या गेटवर सोडण्यासाठी गेले होते. मुलीला शाळेच्या बसमध्ये सोडल्यानंतर विजय नलवडे सोसायटीत परतत असतानाच रेल्वे स्टेशनकडे जाण्याचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी नलवडे यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचून पलायन केले. या वेळी नलवडे यांनी या लुटारूंचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र दोघे गावदेवी मैदानाच्या दिशेने पळून गेले. त्यामुळे नलवडे यांनी तात्काळ रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पावणे सातच्या सुमारास ऐरोली सेक्टर- १९ मधील युरो स्कूलसमोर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या सलील चौधरी (वय ६०) यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन खेचण्यात आली; तर सुरेंद्र वारे (वय ६०) यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चेनदेखील खेचण्यात आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या १५ मिनिटांत तीन ठिकाणी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे ऐरोलीकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तिन्ही प्रकरणी रबाळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
-----------------------------------
गस्त वाढवण्याची मागणी
नवी मुंबईत चेन स्नॅचिंगच्या घटना दिवसाढवळ्या होत आहेत. अनेक भागांत चोरीच्या प्रकारांत वाढ होऊ लागल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होऊ झाली आहे. त्यामुळे सोनसाखळी चोरांवर कारवाईसाठी ऐरोलीच्या सेक्टर- १९ व आजूबाजूच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.