
काल्यबाह्य दूध विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल
नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर) : ऐरोलीतील रिलायन्स मार्टमधून मुदत संपलेल्या (एक्सपायर) दुधाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार जागरूक नागरिकामुळे उघडकीस आला आहे. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी मार्टमधील तीन कर्मचारी, मार्टमधून मुदत संपलेल्या दुधाची कमी किमतीत खरेदी करून त्याची विक्री करणारा दूध डेअरी मालक अशा एकूण चार जणांवर फसवणुकीसह अन्न सुरक्षा मानके अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
रबाळे एमआयडीसीतील पंचशीलनगरमधील ॲड. अमोल उघाडे (३१) २७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता कार्यालयातून घरी जात असताना, वाटेतील धर्मराज दूध डेअरीचा मालक सुरेश डांगी दुधाच्या पिशव्या फाडून पाणी मिसळत असल्याचे निदर्शनास आले. उघाडे यांनी संबंधित कंपन्याच्या दुधाच्या पिशवीवरील कालबाह्य तारीख पडताळून पाहिली असता, ते दूध २६ डिसेंबरलाचा कालबाह्य झाल्याचे निदर्शनास आले. उघाडे यांनी सुरेशकडे विचारणा केली असता, तो हे दूध ऐरोली सेक्टर-१२ मधील रिलायन्स मार्टमधून मागील ६ महिन्यांपासून खरेदी करत असल्याचे सांगितले.
अमोल उघाडे हे स्थानिक नागरिक, महिलांसह मार्टमध्ये जाब विचारण्यासाठी गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र नागरिकांचा रोष पाहून त्यांनी चूक कबूल करून वरिष्ठांसोबत बोलण्यास सांगितले. त्यानुसार २९ डिसेंबरला मार्टचे प्रतिनिधी उघाडे यांना भेटण्यासाठी रबाळे येथे आले. त्यांनी उघाडे यांना प्रकरण मिटविण्याचा आग्रह केला; परंतु उघाडे यांनी नकार देऊन रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार रिलायन्स मार्टमधील गोपाल मोहिबा, अनिल मोरे, शलाका शिंदे व डेअरी मालक सुरेश डांगी या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.