मुजोर कर्मचाऱ्यांमुळे एसटीला आर्थिक फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुजोर कर्मचाऱ्यांमुळे एसटीला आर्थिक फटका
मुजोर कर्मचाऱ्यांमुळे एसटीला आर्थिक फटका

मुजोर कर्मचाऱ्यांमुळे एसटीला आर्थिक फटका

sakal_logo
By

मुंबई, ता. ४ : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरून धावणाऱ्या एसटीच्या बहुतांश फेऱ्या सध्या बंद पडल्याचे चित्र आहे. खोपोली, लोणावळा, तळेगाव मार्गे धावणाऱ्या एसटी बसचालकांकडून परस्पर द्रुतगती महामार्गाने बस नेण्यात येत आहेत. जुन्या महामार्गावरील टोलच्या तुलनेत द्रुतगतीवरील १९० रुपयांचा अतिरिक्त टोल आणि प्रवासी संख्या घटल्याने एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला प्रकार आता उघड झाल्याने दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यातही खोपोली, लोणावळा, तळेगावमार्गे जाणाऱ्यांचीही संख्या बरीच आहे. त्यासाठी एसटीच्या अधिकृत फेऱ्या देण्यात आल्या आहेत. त्यांना सर्व बसस्थानकापर्यंत प्रवाशांची ने-आण करणे सक्तीचे आहे; मात्र प्रत्यक्षात या बसगाड्या जुन्या महामार्गाने जाण्याऐवजी द्रुतगती महामार्गानेच धावत असल्याचे उघड झाले. जुन्या महामार्गावरील धावणाऱ्या बसच्या फास्टटॅगमधून द्रुतगती महामार्गाचा टोल कपात होत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची मुजोरी पकडली गेली आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीमागे एसटीचे सुमारे ६०० रुपयांचे नुकसान होत आहे.
---
चौकशीची टांगती तलवार
एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी जवळपास ६० टक्के प्रवासी जुन्या महामार्गावरील आहेत. केवळ ३९ टक्के प्रवासी द्रुतगती महामार्गावरील आहे; मात्र मुजोर एसटी कर्मचाऱ्यांमुळे एसटी महामंडळाला प्रवासी उत्पन्नासह टोलमुळे आर्थिक फटका बसत आहे. रस्त्यावरील बसगाड्यांच्या फेऱ्या नियमित तपासण्याचे अधिकार मार्ग तपासणी पथकांना असतात; मात्र, मुंबई विभागातील पथकांनी याकडे दुर्लक्ष केले होते. आता या प्रकरणाशी संबंधित अधिकाऱ्यांसह एसटी कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे.
---------
एसटी कर्मचाऱ्यांनी परस्पर काही फेऱ्यांचे मार्ग द्रुतगती महामार्गावर वळते केले. या मार्गावरील फेऱ्या कोणाच्या आदेशाने वळवण्यात आल्या, त्या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. शिवाय झालेले नुकसान त्यांच्या वेतनातून वसूल केले जाणार आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ