
सात वर्षात बदलले उत्तर प्रदेशचे चित्र!
मुंबई, ता. ४ ः उत्तर प्रदेशातील युवकांना आता त्यांच्या राज्याचा अभिमान वाटतो. आमच्या राज्यातील ज्या आजमगडातल्या रहिवाशांना मुंबईतल्या धर्मशाळेतही जागा मिळत नसे, तेथे त्याच जागी आज विमानतळ विद्यापीठ उभे राहात आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज मुंबईत नमूद केले. उत्तर प्रदेशचे वास्तव पूर्णत: बदलले असून गेल्या सात वर्षात तेथे दंगे झाले नाहीत. आता विकासाची गंगा वाहते आहे. आपले राज्य वन बिलियन इकॉनॉमी होणार आहे. विकासाच्या यात्रेत योगदान देण्यास सर्वांनी मदतीचा हात द्या, असे आवाहनही त्यांनी केले.
दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे भोजन आयोजित केले होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट दिली. दरम्यान, शिंदे यांनी योगी आदित्यनाथ आपल्याला भेटायला येणार आहेत असे पत्रकारांशी बोलताना घोषित केले. अयोध्येत शशीकांत महाराज यांच्या निमंत्रणानुसार आपण जाणार आहोत, त्यावरही या भेटीत चर्चा होईल असेही ते म्हणाले. योगी यांनी आज बॉलीवूड तसेच अन्य उद्योगपतींशी चर्चा केली.