
सार्वजनिक वाचनालय कल्याणचा आगळावेगळा उपक्रम
कल्याण, ता. ५ (बातमीदार) : वाचन संस्कृतीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सार्वजनिक वाचनालय नित्य नवनवीन उपक्रम राबवत असते. वाचन प्रेरणा दिनाच्या औचित्याने ‘वाचनालय विद्यार्थ्यांच्या भेटीला’ या उपक्रमाच्या यशस्वीपूर्तीनंतर २ ते ४ जाने २०२३ या कालावधीत ‘विद्यार्थी चालवतात वाचनालय’ हा उपक्रम राबवण्यात आला.
वेगवेगळे साहित्य प्रकार साहित्यिक, दिवाळी अंक, मासिके, बाल साहित्य इ. देवघेव माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आंतरिक प्रेरणा जागृत करून वाचनाची अभिरुची निर्माण व्हावी, तसेच वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन दिवस वाचनालयाच्या कामकाजाची सर्व सूत्रे विद्यार्थ्यांवर सोपवण्यात आली होती. त्याआधी ग्रंथसेविकांनी योग्य ते प्रशिक्षणही त्यांना दिले होते. ग्रंथपाल, सहग्रंथपाल, आर्थिक देवघेव करणे तसेच पुस्तक देवघेव करणे आदींकरिता विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच आलेल्या वाचकांशी विद्यार्थ्यांनी सुसंवाद साधून कोणत्या प्रकारचे वाचन करावे, वाचनासाठी वेळ कसा राखून ठेवावा तसेच वाचनालयाच्या वेगवेगळ्या पद्धती आदी विषयांवर चर्चा केली. विद्यार्थ्यांमधील उत्सुकता जिज्ञासा व आनंदपूर्ती अत्यंत कौतुकास्पद होती. दरवर्षी वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी या उपक्रमात सहभाग घेत असतात. या वर्षी शारदा मंदिर हायस्कूलचे इयत्ता आठवी व इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापक आर. डी. पाटील, शिक्षिका भाग्यश्री ठाकूर, स्वाती पालंडे यांच्या सहकार्यातून वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा उपक्रम राबवण्यात आला.