वाड्यातील उद्योगांना नवसंजीवनी हवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाड्यातील उद्योगांना नवसंजीवनी हवी
वाड्यातील उद्योगांना नवसंजीवनी हवी

वाड्यातील उद्योगांना नवसंजीवनी हवी

sakal_logo
By

दिलीप पाटील ः वाडा
वाडा तालुका ‘वाडा कोलम’ या तांदळाच्या वाणासाठी प्रसिद्ध आहे; तर काही वर्षांपूवी कलिंगडाचे मोठे पीक या तालुक्यात घेतले जात होते. पाच नद्यांचे वरदान लाभलेला हा तालुका सुजलाम सुफलाम असायला हवा होता. अशात तालुक्याचा विकास व्हावा, या उद्देशाने १९९२ मध्ये ‘डी प्लस झोन’ जाहीर करण्यात आला. गेल्या ३० वर्षांत येथील औद्योगिकीकरण वाढण्याऐवजी येथील अनेक कारखाने बंद पडले आहेत; तर काही कारखाने दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत. त्यामुळे येथील उद्योगांना नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
वाड तालुक्यात औद्योगिक धोरण जाहीर झाल्यानंतर देश-विदेशांतील उद्योजकांनी येथील जमीन खरेदीचा सपाटा लावला. शेतीचे उत्पादन होणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांनी विकल्या. ज्या जमिनी शेतकऱ्यांनी विकल्या, त्यांचा किती विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे. यामुळे शेती व्यवसायाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. तसेच ‘डी प्लस झोन’मुळे येथे येणाऱ्‍या उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी अनेक सवलती देण्यात आल्या. येथील उद्योगांमध्ये हिंदुस्थान कोकाकोला कंपनी हा आशिया खंडातला सर्वांत मोठा प्रकल्प इथे आला. कोकाकोलासमोरच ‘ओनिडा’ ही नामांकित कंपनी आहे. एस्सेल पॅकेजिंग, ब्लू स्टार, जिप्सम, गाला, हिल्टन अशा काही कंपन्या आजही सुस्थितीत सुरू आहेत, परंतु एकूण कंपन्यांच्या ४० टक्के एवढ्या स्टील रोलिंग मिल्स मोठ्या प्रमाणात या भागात सुरू झाल्या होत्या. तिथे स्थानिक माणूस काम करू शकत नव्हता, त्यामुळे परराज्यांतून हजारो कामगार आले. खेडोपाडी ते वास्तव्य करून राहू लागले. उद्योगधंद्यांमुळे अनेक पूरक धंदे स्थानिकांनी सुरू केले. यामुळे स्थानिकांना रोजगार मिळू लागला. यामुळे एक चांगले आशादायी चित्र निर्माण झाले होते,
पण १९९२ नंतर साधारण १८ वर्षांनी झपाट्याने झालेला येथील विकास हळूहळू कमी होऊ लागला. त्याला कारण म्हणजे औद्योगिकीकरण होत असताना त्यांना लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करणेही गरजेचे होते. येथील अंतर्गत रस्ते कंपन्यांमध्ये होणाऱ्या अवजड वाहनांसाठी त्रासदायक ठरू लागले. अशातच सरकारने काही सवलती कमी केल्या. विशेषतः स्टील रोलिंग मिल्ससाठी विजेच्या दरातील सवलती बंद केल्याने त्याचा मोठा फटका त्यांना बसला. यामुळे बऱ्याच स्टील मिल बंद झाल्या; तर काही गुजरातकडे स्थलांतरित झाल्या. रोजगार नसल्याने हजारो कामगार निघून गेले. खेडोपाडी त्यांच्यामुळे किराणा सामानाची दुकाने, खानावळी, हॉटेल ओस पडू लागली. उद्योग-धंदे कमी झाल्याने बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या निवासी संकुलांचे दरही खाली येऊनही अनेक संकुले ओस पडली आहेत. ‘डी प्लस झोन’मुळे ज्या वेगाने विकास झाला, त्या वेगाने येथील विकासाला ओहोटी लागली.
‘मेक इन इंडिया’मुळे येथील औद्योगिकीकरणाला नवी दिशा देणारी संकल्पना जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी अगोदरच्या त्रुटींचा सांगोपांग विचार होणे महत्त्वाचे आहे. यासाठी येथील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच तालुक्यात आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यावर प्रशानाने भर दिल्यास ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून येथील उद्योग पुन्हा उभारी घेऊ शकतात, पण या संकल्पना म्हणजे फक्त जाहिरातबाजी न होता त्याची अंमलबजावणी कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.