वाहतूक कोंडीची बोर्डीत डोकेदुखी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक कोंडीची बोर्डीत डोकेदुखी
वाहतूक कोंडीची बोर्डीत डोकेदुखी

वाहतूक कोंडीची बोर्डीत डोकेदुखी

sakal_logo
By

अच्युत पाटील, बोर्डी
घोलवड आणि बोर्डी गावात होणारी वाहतूक कोंडी आता प्रशासनाची डोकेदुखी बनत चालली आहे. मोठी आणि अवजड वाहने आणि रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या पार्किंगमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांमुळे स्थानिक ग्रामस्थांना मात्र याचा फारच त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेऊन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची गरज असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
डहाणूकडून घोलवड आणि बोर्डीमार्गे गुजरात राज्याला जोडणारा राज्य महामार्ग चार हा घोलवड आणि बोर्डी गावातून बाहेर पडतो. या रस्त्यालगतच दोन शाळा, एक महाविद्यालय, दोन कनिष्ठ महाविद्यालय असून सुमारे सात हजार विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतात; पण सततच्या वाहतुकीमुळे या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. पूर्वीच्या काळात या रस्त्यावरून लहानसहान वाहने सहज मार्गक्रमण करत होती; मात्र मागच्या काही वर्षांपासून गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास झाल्याने महाराष्ट्रातून कामगारांची वाहतूक करणारी चारचाकी वाहने, तसेच डहाणू येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेची वाहतूक करणारी अवजड वाहने यांची या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. तसेच ठिकठिकाणी रेल्वे, रस्ते विकास सुरू असल्याने या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहने या चिंचोळ्या रस्त्यावरून मार्गक्रम करतात. अनेकदा या रस्त्यावर अपघात झाल्याने चिंचोळ्या रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत होते. परिणामी अनेक तास या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागतात. अशावेळी रस्त्यालगत राहणारे ग्रामस्थ तसेच गावात खरेदी विक्रीसाठी येणाऱ्या लोकांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून घोलवड आणि बोर्डी गावाच्या बाहेरून सागरी महामार्गासाठी वेळोवेळी सर्वेक्षण झाले आहे. या कामासाठी १९८१ पासून किमान २५ वेळा झालेल्या सर्वेक्षणासाठी रस्ते बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र ४० वर्षात काहीच निष्पन्न झालेले नाही. पण आता येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तसेच स्थानिकांची या कोंडीच्या संकटातून मुक्तता करण्यासाठी लवकरात लवकर पर्यायी मार्गाची बांधणी करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थ करू लागले आहेत.