सोन्‍याच्‍या बदल्‍यात पितळ देऊन पलायन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्‍याच्‍या बदल्‍यात पितळ देऊन पलायन
सोन्‍याच्‍या बदल्‍यात पितळ देऊन पलायन

सोन्‍याच्‍या बदल्‍यात पितळ देऊन पलायन

sakal_logo
By

अंधेरी, ता. ५ (बातमीदार) ः कापड व्यापारी असलेल्या एका वृद्ध जोडप्याची सुमारे ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यात एका महिलेचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांनी स्वस्तात सोने देण्याचे प्रलोभन दाखवून या जोडप्याला पितळ देऊन पलायन केले आहे. सोमवारी (ता. २) पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला असून बोरिवली रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्‍या मदतीने या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करीत आहेत. यातील तक्रारदार कापड व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत भुलेश्‍वर परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांची शिवकुमार माळी नावाच्या एका व्यक्तीशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात सोने आणि चांदीचे दागिने व नाणी असल्याचे सांगितले. तो त्यांच्या मित्रांसोबत एका कंत्राटदाराकडे कामाला असून तिथेच त्यांना सोने आणि चांदीने भरलेले भांडे सापडले. त्यात सोन्याचे दागिने आणि तीनशेहून अधिक चांदीची नाणी आहेत. ते सोने स्वस्तात देण्याचे प्रलोभन दाखवून त्याने त्यांना बोरिवली रेल्वे स्थानकात बोलावले होते. १४ डिसेंबरला तक्रारदार व्यापारी त्यांच्या वयोवृद्ध पत्नीसोबत बोरिवली रेल्वे स्थानकात गेले होते. या वेळी तिथे शिवकुमारसोबत एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण होते. त्यांनी त्यांच्याकडून तीस लाखांची कॅश घेऊन त्यांना एका पिशवीत सोने दिले होते. त्यानंतर ते सर्व जण निघून गेले होते. त्याच रात्री तक्रारदार व्यापारी एका ज्वेलर्सकडे गेले. त्याला ते सोने दिले असता त्याने ते सोने नसून पितळ असल्याचे सांगितले. पितळ देऊन शिवकुमारने त्यांची फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सोमवारी (ता. २) शिवकुमारसह तिन्ही आरोपींविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी बोरिवली रेल्वे स्थानकासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या मदतीने या तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.