पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा
पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा

पलावा पुलावर अनधिकृत रिक्षा थांबा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १६ : कल्याण-शिळ रोडचे काम सुरू असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पलावा पुलावर रिक्षाचालकांनी अनधिकृत रिक्षा थांबा सुरू केला आहे. पुलाच्या तोंडाशीच रिक्षाचालक रिक्षा उभ्‍या करून प्रवासी भाडे आकारत आहेत. भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांची सतत वर्दळ पुलावर सुरू असल्याने एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पलावा जंक्शन परिसरात वाहतूक पोलिस तैनात असतानाही पुलावर बिनधास्त रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांना का अडविले जात नाही, वाहतूक पोलिस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कल्याण-शिळ रोडवरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास मनाई आदेश जारी केले आहेत. मात्र, दुसरीकडे अनधिकृत रिक्षा थांब्यांना मात्र अभय देण्यात येत असल्याचे दिसून येते. कल्याण-शिळ रोडवर ठिकठिकाणी सिमेंट-काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. तसेच देसाई खाडीवर नवीन पूल उभारणीचे कामही सुरू आहे. यामुळे कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीची कोंडी होत असून पलावा जंक्शन हे कोंडीचे मुख्य ठिकाण बनत आहे.
जंक्शन परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी वाहतूक पोलिस तैनात असतात. मात्र ते या रिक्षा चालकांना अडवत नाहीत. या रिक्षा थांब्यास कोणाचे अभय आहे, वाहतूक पोलिस जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करीत आहेत का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
------------------------
वाहने जाहली उदंड
ठाणे, नवी मुंबईवरून कल्याण दिशेला येणारी-जाणारी वाहने, पलावा सिटी, निळजे गाव, कासारिओ परिसरात जाणारे नागरिक, वाहने पलावा जंक्शन येथून प्रवास करतात. पलावा येथे मॉल असल्याने फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची देखील या परिसरात रीघ असते.
-----------------------
प्रवाशांचाही जीव धोक्‍यात
जंक्शन परिसरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने येथे वाहतूक पोलिस तैनात असतात. पोलिसांनी वाहनचालकांना सूचना केल्यावर कोंडीत अडकलेली वाहने भरधाव वेगाने कल्याण दिशेला जाण्यासाठी निघतात. त्यात पलावा सिटीमधून कल्याण दिशेला जाणारी वाहने पुलावर जाण्यासाठी पुलाच्या तोंडाशी वळण घेतात. याच ठिकाणी कल्याण दिशेला जाणाऱ्या लेनवर पुलावर रिक्षाचालक रिक्षा उभ्या करून प्रवासी भाडे आकारतात. पलावा चौकात दोन ते तीन रिक्षा थांबे आहेत. तरीसुद्धा हा वेगळा थांबा कशासाठी, प्रवासीदेखील रिक्षा मिळावी म्हणून जीव धोक्यात घालून तेथून रिक्षा पकडत आहेत.
----------------------------