मलमिश्रित पाण्याचा घोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मलमिश्रित पाण्याचा घोट
मलमिश्रित पाण्याचा घोट

मलमिश्रित पाण्याचा घोट

sakal_logo
By

खारघर, ता.५ (बातमीदार): तळोजा वसाहतीत सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मलमिश्रित पाणी सोसायटीच्या टाक्यांमध्ये मिसळत आहे. या पाण्यामुळे मुले, वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडू लागल्याने पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
तळोजा सेक्टर अकरा वसाहतीमधील अकरा प्लॉट न.३४ ते ४२ लगत असलेल्या सागर विहार, मेट्रो, ड्रीम सिटी, मनोमई, मनोरमासह आणखी काही सोसायटीमध्ये सांडपाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून नेणाऱ्या मलनिःसारण वाहिन्या तुंबल्या असून अनेक ठिकाणी रस्त्यावरच सांडपाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय हे पाणी सोसायटीच्या पाण्यासाठीच्या टाक्यांमध्ये मिसळत असल्याने अनेक ठिकाणी मलमिश्रित पाणी पिण्याची वेळ रहिवाशांवर आली आहे. या पाण्यामुळे परिसरातील लहानमुले आणि वयोवृद्ध व्यक्ती आजारी पडू लागली आहेत, तसेच या सांडपाण्यामुळे दुर्गंधींसह डासांचे प्रमाण वाढल्याने विविध आजारांचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन महिन्यांपासून तळोजा वसाहतीमध्ये ही परिस्थिती ओढवली असून पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये संतापाची भावना आहे.
---------------------------------------
विकतचे पाणी पिण्याची वेळ
तळोजामध्ये अनेक वर्षांपासून पाण्याची तीव्र टंचाई आहे. पाणी समस्या दूर करण्यासाठी मोठ मोठ्या सोसायटीने बोअरवेल बसवले आहेत. मात्र महिनाभरापासून सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे बोअरवेलमधून दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अनेकांवर विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. शिवाय सोसायटीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे तुंबलेले सांडपाणी पालिकेकडून टँकर लावून बाहेर घेऊन जात आहे. पण हा हा प्रकार डोळ्यासमोर होत असल्यामुळे जेवणाची इच्छा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
----------------------------------
मेट्रोच्या कामाचा फटका
सागर विहार, मेट्रो, ड्रीम सिटी, मनोमई, मनोरमापासून हाकेच्या अंतरावर पेठाली मेट्रो स्थानक आहे. मिळालेल्या माहितीनुसार मेट्रो स्थानकाचे काम सुरु असताना बांधकामासाठी लागणारे पाणी मलनिःसारण वाहिन्यातून घेण्यात येत होते. यावेळी वाहिन्यांचे पाणी अडवण्यात आले होते. मात्र, बांधकाम पूर्ण होताच वाहिन्या पूर्ववत करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
-------------------------------------
रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पालिकेने तातडीने मलनिःसारण वाहिन्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घ्यावे, यासाठी पालिका अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
-कैलाश घरत, सामाजिक कार्यकर्ता, तळोजा
--------------------------------------
मलमिश्रित पाणी पिल्यामुळे मुले आजारी पडत आहे. माझ्या मुलीवर नेरुळ येथील डॉक्टरकडे उपचार सुरु आहे. दोन महिन्यांपासून हा त्रास होत आहे.
-कर्णिक सिंग, रहिवासी, सागर विहार सोसायटी
-------------------------------------
सोसायटीच्या आवारात बोअरवेल आहे. मलनिःसारण वाहिनी तुंबल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत बोअरवेलमधून मल मिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे.
-इद्रिस मुल्ला, रहिवासी, कृष्णा आर्केड सोसायटी
---------------------------------------
तळोजा सेक्टर ११ मधील ज्या सोसायटीत सांडपाण्याचा निचरा होत नाही. अशा सोसायट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पाणी काढले जात आहे. लवकर ही समस्या दूर केली जाईल.
-प्रीतम पाटील, एसटीपी प्रमुख, पनवेल महापालिका
--------------------------------------
तळोजा परिसरातील रहिवाशांची तक्रार मिळताच पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. तसेच समस्या दूर करण्याची मागणी केली आहे.
-हरेश केणी, माजी नगरसेवक