
आईचा सन्मान करण्यासाठी निवेदन
विक्रमगड, ता. ५ (बातमीदार) ः श्रमजीवी संघटना महिला ठिणगीच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. या वेळी आईच्या सन्मानासाठी बाळाच्या नावासमोर वडिलांबरोबर आईचेही नाव सर्व सरकारी दप्तरी यावे, अशी मागणी करण्यात आली. या मागणीचे निवदेन ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, नगर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तहसील कार्यालयाच्या आवारात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करून देण्यात आले. याप्रसंगी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामभाऊ वारणा, पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण पडवळे, विक्रमगड तालुका अध्यक्ष लवेश कासट, सचिव पौर्णिमा पवार, मंगेश काळे, जिल्हा माजी उपाध्यक्ष सविता कासट, शहर प्रमुख मेहुल पटेल व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांनी स्त्रिया आणि वंचित समाजाला शिक्षण देऊन त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे यासाठी अपार कष्ट घेतले. राजकीय व खासगी आस्थापनावर, दस्तऐवजावर जेथे कोणत्याही व्यक्तीचे नाव लिहिण्याची सक्ती असते तेथे आईच्या नावाचा अंतर्भाव करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या आराध्या पंडित, स्नेहा दुबे -पंडित, वेणूताई मेघवाले, संगीता, विमल परेड, जया पारधी, सरिता जाधव, रेखा पराड, हिराबाई पवार, नलिनी भुजड, सीता घाटाळ, सुनिता भावर, कुंदा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.