
मोखाडकरांची रात्र अंधारात
मोखाडा. ता. ५ (बातमीदार) ः महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात बुधवारी (ता. ४) ‘काम बंद’ आंदोलन पुकारले होते. यामुळे मोखाडावासीयांना ४ जानेवारीची रात्र अंधारात काढावी लागली. संध्याकाळी मोखाडा शहरात विद्युतपुरवठा सुरू झाला. मात्र, तालुक्यातील काही भागांत विद्युतपुरवठा खंडितच होता. त्यामुळे सलग दोन दिवस मोखाडकरांना रात्र अंधारात काढावे लागले.
महावितरणच्या कर्मचारी संपामुळे ४ जानेवारीच्या रात्री संपूर्ण मोखाडा तालुका अंधारात होता. संध्याकाळी मोखाडा शहरात विद्युतपुरवठा सुरू झाला. मात्र, तालुक्यातील बहुतांश भागात काही काळ वीजपुरवठा सुरू झाला, त्यानंतर पुन्हा रात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीजपुरवठ्यात बिघाड झाला आणि रात्रभर खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना सलग दुसरी रात्र अंधारातच काढावी लागली आहे. दरम्यान, या खंडित वीजपुरवठ्यामुळे इंटरनेट सेवा बंद झाली होती. दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. परिणामी काही बँकांचे व्यवहार दुपारनंतरच सुरू झाले आहेत.