
क्लब फूटने त्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
मुंबई, ता. ६ ः जन्मतः क्लब फूट आजाराने (वेडेवाकडे पाय) त्रस्त असलेल्या ७८ वर्षीय महिलेवर गुडघा प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे या शस्त्रक्रियेनंतर ही महिला स्वतःच्या पायावर नीटपणे उभी राहिली. खासगी रुग्णालयातील गुडघा प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. धनंजय परब यांच्या मार्गदर्शनात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. पुष्पा गुप्ता या क्लब फूट या आजाराने त्रस्त होत्या. वयोमानानुसार त्यांना गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय तपासणीदरम्यान एक्स-रेमध्ये डाव्या पायातील गुडघ्यात गॅप असल्याचे निदान झाले. त्यावरील उपचारादरम्यान पायाला सूज आली. पुढील तपासणीत त्यांच्या डाव्या पायातील गुडघ्याची झीज झाल्याचे दिसून आले. त्यावर गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय होता. त्यानुसार शस्त्रक्रिया केल्यानंतर सदर महिला पुन्हा आपल्या पायावर उभी राहिली.