
पत्रकारांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
विरार, ता. ७ (बातमीदार) : आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकारांवरील जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे त्यांच्यावर येणारा मानसिक व शारीरिक ताण पाहता पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार जॉन कोलासो यांनी केले. वसई तालुका पत्रकार संघाने पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते.
आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीनिमित्त वसई तालुका पत्रकार संघाने वोक्हार्ट हॉस्पिटलच्या साह्याने पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अध्यक्ष संदीप पंडित यांनी केले. या वेळी पत्रकार संघ पत्रकारांसाठी राबवत असलेल्या विविध योजना व आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. या वेळी उपस्थितांचे स्वागत संघाचे खजिनदार अरुण सिंह यांनी केले.
या कार्यक्रमात माजी महापौर नारायण मानकर, प्रवीण शेट्टी, माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिक्स, परिवहन समिती सभापती भरत गुप्ता तसेच वसई विकास बँक आणि वसई शेतकरी सोसायटीचे अध्यक्ष आशय राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिरामध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलचे समन्वयक माधव अईल, डॉ. रिशिता राय, डॉ. अश्विनी खंदारे, परिचारिका हर्षिता मिश्रा, प्रवीण विश्वकर्मा आदींनी उपस्थित पत्रकारांची आरोग्य तपासणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव आशिष राणे यांनी; तर उपाध्यक्ष भरत म्हात्रे यांनी आभार मानले.