
पारंपरिक दागिने बनवण्याचे प्रशिक्षण
बदलापूर, ता. ७ (बातमीदार) : महिला व मुलींनी स्वयंरोजगार निर्माण करावा, यासाठी निर्भया सामाजिक संस्थेच्या वतीने बदलापूर शहरात नथ व पारंपरिक दागिने बनवण्याचे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन रविवारपासून (ता. ८) करण्यात आले आहे. सध्या बाजारात जुन्या पारंपरिक दागिन्यांना नव्या ट्रेण्डचा साज चढवत पुन्हा नथ, ठुशी, मोत्यांचे दागिने व इतर पारंपरिक दागिने घालण्याकडे तरुणी तसेच महिलांचा ओढा वाढला आहे. हाच ट्रेंड ओळखून आयोजित केलेल्या या शिबिरात महिलांना नथ, ठुशी, बोरमाळ, मोत्यांचे दागिने, राणी हार, चिंचपेटी असे अनेक पारंपरिक दागिने बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण घेऊन महिला तसेच मुलीदेखील स्वतःचा असा छोटा व्यवसाय करून स्वतःच्या पायांवर उभ्या राहू शकतील, असा विश्वास आयोजिका व निर्भया सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर यांनी व्यक्त केला आहे.