मुंबई पोलिस दलातील अवलिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई पोलिस दलातील अवलिया
मुंबई पोलिस दलातील अवलिया

मुंबई पोलिस दलातील अवलिया

sakal_logo
By

ऑनड्युटी

टाटांनी गौरवलेला ‘वर्दी’तील दर्दी चित्रकार!

केदार शिंत्रे ः मुंबई
पोलिस दलात कार्यरत अनेक अधिकारी तसेच कर्माचाऱ्यांच्या अंगी अनेक कला दडलेल्या आहेत. कुणी चित्रकार, कुणी गायक आहे; तर कुणाला अन्य काही कला अवगत आहेत. महामार्ग पोलिस विभागात कार्यरत रमेश चोपडे यांनीही अशाच प्रकारे कामातून वेळ काढत चित्रकला जोपासली आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनीही त्यांच्या कलेचे कौतुक करत त्यांना गौरवले आहे.


‘वर्दी’तील दर्दी कलकार पोलिसी कर्तव्य चोख बजावत असतानाच मिळणाऱ्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग आपली कला जोपासण्यासाठी करत असतात. त्यातून साकारलेली कलाकृती त्यांना एक वेगळी ओळखही मिळवून देते. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मान्यवरांनीही त्यांच्या कलेचे वेळोवेळी कौतुक केलेले आहे. महामार्ग पोलिस विभागात कार्यरत रमेश चोपडे त्यापैकीच एक. शाळेपासूनच चित्रकलेची आवड असलेले चोपडे वारली पेंटिंग, कॅन्व्हान्स आणि तैलचित्रांबरोबरच अन्य चित्रेही रेखाटतात.

वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते मुंबईत अतिरिक्त आयुक्त असताना त्यांनी आपल्या कार्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात वारली चित्रे काढून घेतली होती. ती चित्रे रमेश चोपडे यांनी साकारली होती. तेव्हा सदानंद दाते यांच्याकडून चोपडे यांना शाबासकीची थाप मिळाली होती.
चोपडे यांनी अनेक प्रकारची अनेक चित्रे रेखाटली आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पोलिस महासंचालक डी. शिवानंदन, माजी आयुक्त ए. एन. रॉय इत्यादींसारख्या अनेकांची चित्रे काढून चोपडे यांनी त्यांना भेट म्हणून दिली आहेत. आपला चित्रकलेचा प्रवास निरंतर सुरू ठेवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे.

रतन टाटांकडून कौतुक
रमेश चोपडे यांनी काही दिवसांपूर्वी उद्योगपती रतन टाटा यांचे चित्र आपल्या कुंचल्यातून साकारले. टाटा यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना ते देण्याची त्यांची इच्छा होती. २० ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांनी टाटा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्या भेटीबाबत रमेश चोपडे यांनाही कळवण्यात आल्याने ते सपत्निक उपस्थित होते. पोलिस अधिकाऱ्यांशी टाटा यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर चोपडे यांनी त्यांना त्यांचे चित्र भेट दिले. आपले हुबेहूब चित्र पाहून टाटाही अवाक् झाले. एका पोलिसाने चित्र काढल्याचे पाहून त्यांचा आधी विश्वासच बसेना. चित्र न्याहाळत असतानाच टाटा यांनी चोपडे यांच्या पाठीवर हात ठेवत ‘जबरदस्त’ अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले.