
मोबाईल चोरीच्या संशयावरून मारहाणीत इसमाचा मृत्यू
ठाणे, ता. ७ (वार्ताहर) : लोकलमध्ये मोबाईल चोरटा असल्याच्या संशयावरून ४३ वर्षीय इसमाला मुंब्रा स्थानकावर उतरल्यानंतर केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मोबाईल चोर असल्याच्या संशयातून कमलाउद्दीन अन्सार शेख (वय ४३, रा. मुंब्रा) याला मुंब्रा स्थानकात २ जानेवारी २०२३ रोजी मारहाण करण्यात आली होती. रेल्वे सुरक्षा बल जवानांनी सीसी टीव्ही तपासणीत घटनेच्या दिवशी चार जण लगबगीने मुंब्रा स्थानकाच्या बाहेर जाताना आढळले. त्याआधारे संशयित आरोपीची बातमीदारांमार्फत ओळख पटली. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने असिफ अली सुर्वे (वय २१, रा. मुंब्रा) याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने कमलाउद्दीन शेख हा मोबाईल चोरताना आढळला होता. त्याला स्थानकावर अन्य दोन सहकाऱ्यांच्या मदतीने मारहाण केल्याचे त्याने सांगितले. लोहमार्ग गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने पुढील कारवाईसाठी संशयित सुर्वे याला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितले.