
पोलिस उपनिरीक्षकाचा लोकलमधून पडून मृत्यू
अंधेरी, ता. ७ (बातमीदार)ः पवई पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मनोज गजानन भोसले (वय ५७) यांचा शुक्रवारी रात्री ठाणे-कळवादरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. दिवसपाळीचे कर्तव्य बजावून घरी जाताना हा अपघात झाल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. त्यांच्या निधनाने पोलिस दलात शोककळा पसरली आहे.
मनोज भोसले हे सध्या कळवा येथील पारसिकनगरमध्ये त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होते. शुक्रवारी दिवसपाळीचे काम करून ते सायंकाळी ७ वाजता पोलिस ठाण्यातून घरी जाण्यासाठी निघाले होते. रात्री सव्वाबारा वाजता विशेष शाखेचे पोलिस हवालदार बेदरकर यांना रात्री सव्वानऊ वाजता चालत्या लोकलमधून एक व्यक्ती पडल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे गेल्यानंतर संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे पोलिसांना समजले. त्यांच्या पाकिटात ओळखपत्र सापडले. चौकशीत ते उपनिरीक्षक असून कामावरून घरी जाण्यासाठी निघाले होते. या वेळी रात्री चालत्या लोकलमधून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती. ही माहिती नंतर संबंधित पोलिसांसह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली होती. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात वरिष्ठ पोलिस निरीक्षक बुधन सावंत, पोलिस उपनिरीक्षक संतोष सावंत यांनी भेट दिली होती. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अजिंक्य मनोज भोसले उपस्थित होता.