एमआयडीसीमुळे रहिवाशांना धोका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयडीसीमुळे रहिवाशांना धोका
एमआयडीसीमुळे रहिवाशांना धोका

एमआयडीसीमुळे रहिवाशांना धोका

sakal_logo
By

वाशी, ता. ८ (बातमीदार) ः ऐरोली सेक्टर एकमध्ये असणाऱ्या एमआयडीसीतील कंपनीला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली होती. या वेळी घटनास्थळी पोहचण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनांना कंपनी परिसरातील मार्जिनल स्पेसमध्ये केलेल्या अतिक्रमणांमुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सिडकोच्या रहिवासी क्षेत्रामध्ये असलेल्या एमआयडीसीचा परिसर स्थलांतरित करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये पूर्व बाजूला औद्योगिक क्षेत्र व पश्चिमेस सिडकोचे रहिवासी क्षेत्र आहे; पण ऐरोली नाका या पश्चिमेच्या एमआयडीसीची जागा असून अनेक भूखंड उद्योजकांना दिलेले आहे; पण या एमआयडीसी क्षेत्रामुळे आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या एमआयडीसी क्षेत्राला लागून महापारेषणचे उपकेंद्र आहे; तर समता नगर, गणपती कॉलनी, साई कॉलनी, साईनाथ नगर अशा रहिवासी परिसरदेखील एमआयडीसी क्षेत्राच्या बाजूला आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये येणाऱ्या अवजड वाहनांचा मनस्ताप रहिवाशांना सहन करावा लागत आहे. काही वर्षांपूर्वी अशाच एका अपघाताच समतानगर परिसरामधील मुलांचा दुर्दैवी मुत्यू झाला होता; तर या एमआयडीसी परिसरांमध्ये झालेल्या वाढत्या अतिक्रमणामुळे आग विझवण्यास आलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे वाढते अतिक्रमण रोखण्यासोबतच एमआयडीसी स्थलांतरित करावी, अशी मागणी माजी नगरसेवक अनंत सुतार यांनी केली आहे.
----------------------------
ऐरोली सेक्टर एक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती आहे; परंतु या नागरी वस्तीतच एमआयडीसीने काही लघु उद्योगांना जागा दिल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रहिवासी क्षेत्रातून जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे एका मुलांचादेखील अपघातात मृत्यू होण्याची घटना घडली होती. त्यामुळे पालिकेकडेदेखील एमआयडीसी स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे.
- अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती, नमुंमपा