समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ
समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ

समविषम पार्किंगचा बट्ट्याबोळ

sakal_logo
By

वाशी, ता. ८ (बातमीदार) ः नियोजनबद्ध शहराची शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक जटील होत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नो पार्किंग जागेतच वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई वाहतूक विभागाच्या वतीने शहरात सम-विषम पार्किंगचे केलेले नियोजन नावापुरते उरले असून दुतर्फा पार्किंग केले जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
झपाट्याने विकसित झालेल्या नवी मुंबई शहरात पार्किंगच्या नियोजनाचा बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र आहे. सिडकोने नियोजनबद्ध वसवलेल्या या शहरातील बेलापूर ते दिघा या उपनगरात सम-विषम पार्किंगसाठीचे फलक पाहायला मिळतात, परंतु वाहनांची संख्या वाढल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर मिळेल तिथे गाड्या पार्क केल्या जात आहेत. यात वाशी ते बेलापूर या हार्बर मार्गावरील रेल्वेस्थानक परिसरात हा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. अशातच पालिकेने विकास आराखड्यात पार्किंगसाठी व विविध सामाजिक कारणांसाठी राखीव ठेवलेल्या भूखंडांची सिडकोने विक्री करण्यास सुरुवात केल्यामुळे पालिका व सिडकोमधील असमन्वयाचा फटका पार्किंगला बसला आहे.
-----------------------------------------
शहरांतर्गत नियोजन कोलमडले
वाशी ते कोपरी पाम बीच मार्गावर बेकायदा पार्किंगचा प्रश्न अतिशय बिकट झाला आहे. बेलापूर-किल्ले गावठाण चौकापासून वाशीपर्यंत पाम बीच मार्गावर कोठेही पार्किंग होत नसताना वाशी उपनगरालगतच रस्त्याच्या दुतर्फा पाम बीच मार्गावर पार्किंग केले जात आहे. या ठिकाणी वारंवार कारवाई करूनही पार्किंगचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. तसेच शहरांतर्गत पार्किंगचा पुरता बोजवारा उडत आहे. कार्यालयीन वेळांबरोबरच संध्याकाळच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पार्किंग करायचे तरी कुठे, असा प्रश्न सतावत आहे.
-------------------------------------
भविष्यात ठोस उपाययोजनांची गरज
नवी मुंबईचा क्वीन नेकलेस असलेला पाम बीच मार्ग प्रसिद्ध आहे, परंतु याच मार्गावर वाशी रेल्वे उड्डाणपूल सोडताच आरेंजा सिग्नलपासून ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत बेकायदा पार्किंग पाहायला मिळते. हीच परिस्थिती १७ प्लाझा परिसरात आहे. या मार्गावर बेकायदा पार्किंगमुळे पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे भविष्यात शहरातील पार्किंगबाबत ठोस उपाययोजना झाल्या नाही, तर वाहतूक कोंडीची मोठी समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.
-------------------------------------
नवी मुंबई शहरात बेकायदा पार्किंगवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. सम-विषम पार्किंग फलक लावले आहेत. तसेच बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग