
गुलालाच्या उधळणीत पालखी सोहळा
विरार, ता. ८ (बातमीदार) : बँड, ढोल, ताशाचा गजर आणि गुलाल-भंडाऱ्याची उधळण करत जूचंद्र गावात मोठ्या जल्लोषात वज्रेश्वरी देवीची पालखी दाखल झाली. या वेळी देवीच्या दर्शनासाठी मोठा जनसागर उसळला होता.
वसई किल्ला जिंकल्यानंतर चिमाजी आप्पांनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर उभारले. त्या काळापासून देवीचा पालखी सोहळा आयोजित केला जात आहे. १७३९ ते २०२३ हा पालखी उत्सवाचा कालखंड पाहता यंदा सोहळ्याला २८४ वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवारी देवीची पालखी वसई किल्ल्यातून दुपारी विधिवत पूजा होऊन निघाली. वज्रेश्वरी देवीची बहीण साकाई हिला भेटण्यासाठी ही पालखी जूचंद्र गावात पोहचली. जूचंद्र गावात पालखीचे स्वागत करण्यासाठी जनसागर लोटला होता. या वेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
------------------
नऊवारी साड्या, पगडी-फेटे
उत्सवात महिलांनी नऊवारी साड्या, डोक्यावर फेटे; तर पुरुषांनीही त्या काळातील पगड्या आणि फेटे परिधान करून मिरवणुकीत सामील झाले होते. रात्रीही पालखी चंडिका मंदिरात वस्तीला होती. रविवारी (ता. ८) सकाळी पालखीने केळवे येथे प्रस्थान केले. या उत्सवात जूचंद्र धार्मिक सेवा संस्था व श्री चंडिका देवस्थान, जूचंद्र ग्रामस्थ सर्व मंडळे, किल्ले वसई मोहीम परिवार महाराष्ट्र, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, स्वराज्य समूह शिरगाव, समस्त दुर्गमित्र परिवार, संवर्धन मोहीम केळवे, गडमाची ट्रेकर्स मुंबई यांच्यासह जूचंद्र गावाच्या बाजूच्या पंचक्रोशीतील लोक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.