गोवरचा नवा हॉटस्पॉट कुर्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोवरचा नवा हॉटस्पॉट कुर्ला
गोवरचा नवा हॉटस्पॉट कुर्ला

गोवरचा नवा हॉटस्पॉट कुर्ला

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : पालिकेच्या एल प्रभागाने (कुर्ला) आता गोवर प्रकरणांमध्ये एम-पूर्व (गोवंडी) वॉर्डला मागे टाकले आहे. पालिका आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कुर्ल्यामध्ये इतर प्रभागांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि संशयित रुग्ण आजही आढळून येत आहेत.

७ नोव्हेंबर २०२२ रोजी गोवंडीतील एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर पालिकेच्या आरोग्य विभागाने तपास सुरू केला. तिन्ही मुलांना गोवर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर संपूर्ण कॅम्पसमध्ये पाळत ठेवणे सुरू झाले आणि गोवंडी व देवनारसारख्या भागांचा समावेश असलेल्या एम-पूर्व प्रभागांत गोवरचे अनेक रुग्ण नोंदवले गेले. जानेवारी २०२२ ते ६ जानेवारी २०२३ पर्यंत एम-पूर्व प्रभागात गोवरचे ७१ रुग्ण आढळून आले. मात्र, कुर्ला, साकीनाका आणि चांदिवली भागांचा समावेश असलेला एल वॉर्ड आता सर्वाधिक बाधित प्रभाग बनला आहे. याच कालावधीत एल वॉर्डात गोवरचे ७३ रुग्ण आढळून आले आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एल वॉर्डमध्ये गोवरचे संशयित रुग्ण अजूनही आढळून येत आहेत. मात्र, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येथे दररोज सुमारे १५ ते २० संशयित रुग्ण आढळून येत होते. मात्र, आता एका दिवसात सुमारे चार ते पाच संशयित रुग्ण सापडत आहेत. स्थानिक आरोग्य अधिकारी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या एकूण अंदाजे लोकसंख्येपैकी सुमारे ४५ टक्के नागरिकांना लस देण्यात आली आहे.

आतापर्यंत ५०० हून अधिक रुग्ण
मुंबईत आतापर्यंत ५६३ गोवर रुग्ण आढळले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर आठ मृत्यू संशयास्पद आहेत. मृत्यू पुनरावलोकन समितीकडून त्यांचे लेखापरीक्षण केले जात आहे.

लसीकरण स्थिती
- ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थी बालके ः २,६२,३६९
- लस देण्यात आलेली बालके ः १,१२,८६०
- एकूण लसीकरण ः ४३ %
- आरोग्य केंद्रे ः ८१
- ६ महिने ते ९ महिने वयोगटातील एकूण बालके ः ५२९३
- लस देण्यात आलेली बालके ः २६६६
- एकूण लसीकरण ः ५०.३७ %