उड्डाणपूल रंगवणाऱ्यांना मिळाले सेफ्टी बेल्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उड्डाणपूल रंगवणाऱ्यांना मिळाले सेफ्टी बेल्ट
उड्डाणपूल रंगवणाऱ्यांना मिळाले सेफ्टी बेल्ट

उड्डाणपूल रंगवणाऱ्यांना मिळाले सेफ्टी बेल्ट

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ८ (बातमीदार) ः घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपूल रंगवणाऱ्या रंगाऱ्याच्या सुरक्षेसंदर्भात निष्काळजीपणा केल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. मागील आठवड्यात (ता. ३०) याविषयीची बातमी ‘सकाळ’मध्‍ये उड्डाणपूल रंगवणाऱ्यांच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली होती. त्यानंतर प्रशासनाचे डोळे उघडले व त्या रंगाऱ्याच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवल्याचे दिसत आहे.
घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाची रंगरंगोटी मागील काही दिवसांपासून सुरू आहे; मात्र येथील रंगाऱ्यांच्या मात्र जीवाशी खेळ करत हे काम सुरू होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक उपाययोजना त्या ठिकाणी केली गेली नसल्याचे दिसत होते. दिवस-रात्र वर्दळ सुरू असलेल्या रस्त्यालगत हे काम सुरू असल्यामुळे अपघाताची भीती नागरिक व्यक्त करत होते. ही व्यथा ‘सकाळ’ने मांडली. त्यानंतर प्रशासन व कंत्राटदाराला जाग आली. रंगरंगोटी करताना तोल जाऊन पडू नये यासाठी सेफ्टी बेल्टचा वापर सुरू झाल्याचे आता दिसत आहे. ज्ञानसंपदा शाळेतील कलाशिक्षक निशिकांत कांबळे यांनी बातमीच्या या परिणामाचे छायाचित्र काढत कौतुक केले आहे.